महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
‘जलयुक्त शिवार’मुळे दोन वर्षात राज्य दुष्काळमुक्त होणार - मुख्यमंत्री गुरुवार, ०४ जानेवारी, २०१८
बातमी
राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराचे शानदार समारंभात वितरण

मुंबई, दि. 4 : गेल्या तीन वर्षात राज्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यातील अकरा हजार गावे जलपरिपूर्ण झाली असून यावर्षी आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. जलयुक्तमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झाले असून या गतीने पुढील दोन वर्षे कामे केली तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.

सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत सन 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ति, संस्था, अधिकारी व पत्रकारांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले. यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्याचे मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त दीपक सिंघला, कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या लोगोचे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच लोगो तयार स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या किशोर गायकवाड यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या आसूड या त्यांच्या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी सांगितलेल्या उपायातूनच जलसंधारणाची ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली. निसर्गावर, पावसावर अवलंबून राहलो तर शेतीचा शाश्वत विकास होऊ शकणार नाही. राज्यातील 82 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू असून राज्यातील सर्व धरणे भरली तरीही 50 टक्के क्षेत्र पाण्याखाली येऊ शकणार नाहीत. त्यामुळे या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. यापूर्वीही जलसंधारणाच्या 14 योजना सुरू होत्या मात्र, त्यामध्ये समन्वय नसल्यामुळे त्याचा उपयोग होत नव्हता. जलयुक्त योजना राबविताना जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली या सर्व योजना एकत्र केल्या. यामुळे पहिल्याच वर्षी जलयुक्त योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. लोकसहभाग व प्रशासन हेच या योजनेचे खरे शिल्पकार आहेत.

जलयुक्त योजना आणखी पुढे न्यायची आहे. आतापर्यंत झालेली कामे निरंतर रहावीत, यासाठी नियोजन केले आहे. येत्या दीड वर्षात संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी अधिक जोमाने कामे करावी लागणार आहेत. या कामासाठी लोकसहभागाबरोबरच अभिनेता आमीर खानचे पाणी फाऊंडेशन, अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे नाम फाऊंडेशन, दिलासा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांबरोबरच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, डॉ. अविनाश पोळ, पोपटराव पवार यांनी या योजनेत मोठे योगदान दिले आहे. तसेच टाटा ट्रस्ट, बजाज फाऊंडेशन याबरोबर अनेक कार्पोरेट कंपन्यांनीही सहकार्य केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पुरस्कारामुळे जबाबदारी वाढणार असून अधिक वेगाने काम करायचे आहे. टाटा ट्रस्टने दिलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक अचूक कामे करण्यात येतील. पुढील काळात याच पद्धतीने कामे केली तर तो दिवस दूर नसेल ज्यावेळी दुष्काळ हा भूतकाळ असेल आणि कमी पावसातही राज्यातील शेतकरी शाश्वत शेती करू शकेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्योत्तर काळातील ही सर्वात यशस्वी योजना आहे, असे सांगून मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, गेल्या तीन वर्षात जलयुक्तच्या कामांमुळे राज्यातील गावे जलयुक्त झाल्यामुळे या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. गावांना विकासाचा केंद्रबिंदू मानून विकेंद्रीत पाणीसाठा निर्माणाचे काम यातून झाले आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या सहभागामुळे दुष्काळावर मात करणे शक्य झाले आहे. लोकभावना व लोकचळवळीच्या माध्यमामुळे या योजनेला यश मिळाले असून यामुळे खरीप व रब्बी पिकाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. या योजनेच्या यशाची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेऊन ही योजना देशभर राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. जलयुक्त शिवार योजनेबरोबरच आदर्श गाव योजना राबविण्यात येत असून त्यातील कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असून पुढील वर्षीपासून या योजनेचे पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे.

राज्यमंत्री श्री. शिवतारे यांनी जलयुक्तमुळे झालेल्या कामांचा आढावा घेऊन सांगितले, राजकीय पाठबळ, कर्तव्यदक्ष अधिकारी व लोकसहभाग यामुळे एखादी सरकारी योजना लोकचळवळ कशी होते, हे जलयुक्त शिवारमुळे दिसून आले आहे. या योजनेतून जुन्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन केल्यामुळे कमी खर्चात मोठे कामे झाले आहे. अशा योजनेच्या माध्यमातून राज्याला पहिल्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प आहे.

यावेळी आमदार सर्वश्री संजय कदम, राहूल आहेर, शशिकांत खेडकर, मृद संधारणचे संचालक श्री. मोते आदी यावेळी उपस्थित होते.

पुरस्कार विजेते-
राज्यस्तरावरील महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र प्रथम पुरस्कार मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर), द्वितीय क्रमांक वेळू (ता. कोरेगाव, जि. सातारा), कर्जत (ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांना तर राज्यस्तरावरील तालुका संवर्गामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यास प्रथम, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यास द्वितीय तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यास तृतीय पुरस्कार देण्यात आले. तर राज्यस्तरीय जिल्ह्यांचे पुरस्कारामध्ये सोलापूर जिल्ह्याचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पुण्याचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव व अहमदनगर जिल्ह्याचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी स्वीकारला. तर विभागस्तरावर प्रथम आलेल्या जिल्ह्यांचा पुरस्कार कोकण विभागातून ठाणे जिल्ह्याचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, नाशिक विभागातून अहमदनगर जिल्ह्याचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे,औरंगाबाद विभागाचा पुरस्कार उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, अमरावती विभागातून अमरावतीचे तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते व नागपूर विभागातून नागपूरचे अपर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

सामुदायिक/अशासकीय संस्थांमध्ये प्रथम पुरस्कार संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी ता.बिलोली, जि.नांदेड यांना, तर द्वितीय पुरस्कार आर्ट ऑफ लिव्हिंग सेवा भावी संस्था, जालना यांना देण्यात आला. वैयक्तिक पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार संजय ज्ञानोबा शिंदे, नेकनूर ता. जि. बीड व द्वितीय पुरस्कार सुभाष उत्तमराव नानवटे, रा. दोडकी, ता.जि.वाशिम प्रदान करण्यात आला.

पत्रकारांसाठीचा प्रथम पुरस्कार अविनाश अंकुशराव कदम, दै.पुण्यनगरी, पुणे; द्वितीय पुरस्कार संदीप दत्तू नवले, ॲग्रोवन,अहमदनगर; तृतीय पुरस्कार श्रीमती संगीता हनुमंतराव भापकर, दै.सकाळ यांना, तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रथम पुरस्कार रवींद्र शिवाजी कांबळे, सांगली; द्वितीय पुरस्कार शशांक रमेश चवरे, अमरावती; तृतीय पुरस्कार शशिकांत पाटील, लातूर यांना देण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये राज्यस्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल सहसचिव वि.सि.वखारे, अवर सचिव ना.श्री.कराड, अवर सचिव शंकर जाधव, सहायक कक्ष अधिकारी सुनील गवळी यांनाही गौरविण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा