महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी इंडियन मर्चंट चेंबरने योगदान द्यावे- प्रधानमंत्री गुरुवार, १३ एप्रिल, २०१७
बातमी
महिला शाखेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

मुंबई : नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र शासन एक रोडमॅप ठरवत असून या आराखड्यामध्ये इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि त्यांच्या महिला शाखेने योगदान द्यावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला शाखेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थित महिला उद्योजकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, अभिनेत्री कतरिना कैफ, फॅशन डिझायनर शायना एनसी यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला उद्योजिका उपस्थित होत्या.

यावेळी संवाद साधताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला शाखेने गेल्या ५० वर्षात केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था जेव्हा ५० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करते तेव्हा तो एक इतिहास बनतो. ५० वर्षांत आयएमसीने महिलांसाठी काम करताना त्यांना स्वयंभू बनविण्यासाठी केलेले प्रयत्न अभिनंदनास पात्र आहेत. ज्या महिलांमध्ये सामर्थ्य, निर्णयक्षमता असते त्याच देशाच्या आर्थिक विकासात योगदान देऊ शकतात. आज उपस्थित असलेल्या महिलांना ही संधी मिळाली आहे. माझ्या मते ज्या महिलांना संधी ,पाठिंबा मिळतो त्या महिला पुरुषांपेक्षाही उत्तम कामगिरी करत असल्याचेही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.

‘पंचायत ते सांसद’ व ‘गाव ते सिलिकॉन व्हॅली’ असा आजच्या महिलांचा प्रवास राहिला आहे. कृषि, पशुपालन, आदिवासी विकास या क्षेत्रात तर महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे म्हणूनच या महिलांना अधिकाधिक सक्षम करणे ही आपली जबाबदारी आहे. संयम, सामर्थ्य आणि संघर्ष करण्याची ताकद या उपजत गुणांमुळेच महिला आकाशाला गवसणी घालू शकतात हे आज त्यांनी दाखवून दिले असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

महात्मा गांधींना गंगा माँ यांची प्रेरणा

राष्ट्रपिता महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. तेव्हा साबरमती आश्रमात राहू लागले तेव्हा त्यांना गंगा माँ विषयी माहिती मिळाली. गंगा माँ बालविधवा होत्या पण गांधीजी जेव्हा भेटायला गेले तेव्हा याच गंगा माँ ने त्यांना चरखा दिला. महात्मा गांधींना या चरख्यामुळे प्रेरणा मिळाली. महिलांचे सक्षमीकरण या चरख्याच्या माध्यमातून होऊ शकते ही दूरदृष्टी गंगा माँ ला होती. आधुनिक काळात आपण महिलांना सक्षम करुनच पुढे जात असून त्यासाठी नियमांमध्ये विविध बदल केले जात आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा, प्रधानमंत्री आवास सारख्या योजनांद्वारे महिलांचा आर्थिक विकास व सशक्तीकरण यावर भर देण्यात येत असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.

इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला शाखेची 50 वर्षातील कामगिरी कौतुकास्पद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेल्या 50 वर्षात संपूर्ण समाजव्यवस्थाच बदलत होती, याच दरम्यान आयएमसी महिला शाखेने आपल्या स्वतःचा एक आगळा वेगळा ठसा उमटवण्याचे काम केले. गेल्या ५० वर्षातील या शाखेची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी काढले.

महिला उद्योजकांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याचे, पुढे नेण्याचे काम केले असून त्यांनी केलेली कामगिरी येणाऱ्या काळातही अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण करुन त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे. तरच देशाची प्रगती होणे शक्य आहे. युरोप, चीन, कोरिया यासारख्या देशांने सुद्धा प्रगती करताना महिला या मनुष्यबळ आहेत, असे मानले आणि त्यामुळेच ते अतिशय कमी काळात प्रगती करु शकले. आपल्याकडे आज 50 टक्के महिलांची लोकसंख्या ही मानवसंसाधन आहे, असे मानले तर अर्थव्यवस्था सक्षमीकरणासाठी त्यांचा वापर करु शकतो. आज भारतामध्ये सुद्धा ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या २५ पेक्षा कमी वयोगटातील आहे. या तरुण पिढीचा आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उद्योग व्यवसायामध्ये फायदा होईल, असे सांगून महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी इंडियन मर्चंट चेंबर्सचे कौतूक केले.

आजच्या तरुणांमध्ये असलेली प्रयोगशीलता त्याला असलेली तंत्रज्ञानाची जोड यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात विक्रम प्रस्थापित करणे शक्य आहे. या विक्रमासाठी राज्य शासनाच्या स्टार्ट अप योजनेतून बळ मिळते आहे. समाज बदलविण्यासाठी महिलांची प्रगती होणे आवश्यक असून महिला सक्षम झाल्या तर समाज सुद्धा नक्कीच सक्षम होतो. गेल्या 50 वर्षात आयएमसी यांनी महिलांच्या विकासात आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान दिले आहे.

याच कार्यक्रमादरम्यान महिला उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली. कुपोषण, प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती, एक हजार गावांमध्ये दुष्काळ दूर करण्यासाठी राबविले जात असलेले उपक्रम, मुंबईतील मेट्रो आदी प्रकल्पांविषयी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी आयएमसीच्या कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. पूनम महाजन यांच्या हस्ते पुण्याच्या पोलीस आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला, सामाजिक क्षेत्रातील चेतना गाला-सिन्हा, शिक्षण क्षेत्रातील प्रा. मीरा इसाक, फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा