महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
गडचिरोलीचा विकास राज्याच्या केंद्रस्थानी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार, १२ मे, २०१७
बातमी
आलापल्लीत तालुकास्तरापर्यत कामांचा आढावा

आलापल्ली (गडचिरोली)
: विकास घडविण्याचा संकल्प मनात ठेवून अधिकाऱ्यांनी काम करावे. या भूमिकेतून तालुकास्तरापर्यंत आढावा घेणे सुरु आहे. शासनाने पूर्ण लक्ष गडचिरोलीच्या विकासावर केंद्रीत आहे. यासाठी निधी किंवा निर्णय कमी पडू दिले जाणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

येथील उपविभागीय वनसंरक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, जि.प.अध्यक्षा योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री मितेश भांगडिया, डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पालकसचिव विकास खारगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात सर्वच यंत्रणांनी काम चांगले केले. मात्र जे मागे आहेत त्यांनी आगामी काळात आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करावी. सामान्य आणि शेवटच्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ पोहोचणे हा खरा विकास आहे. सर्वांनी यात आपला सहभाग नोंदविलाच पाहिजे.

वीज पुरवठ्याचे आव्हान

जिल्ह्यात अद्यापही 239 गावात वीज पुरवठा झालेला नाही. याला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानंतर आतापर्यंत 42 गावांना वीज पुरवठा झाला आहे. यात पहिल्या टप्प्यात 89 गावे जून 2017 अखेर जोडली जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी आपल्या सादरीकरणात सांगितले. सर्वच गावांना जून 2018 अखेर वीज जोडणी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी दिले.

कृषी पंप जोडणीअंतर्गत जिल्ह्यात एक लाखांहून अधिक शेतकरी आहेत. वीज पंपासाठी जोडण्यांची संख्या 19 हजारांहून अधिक आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारकांना यात सामील करण्यासाठी विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सिंचनाचा आढावा

वनांमुळे जिल्ह्यात मोठे प्रकल्प उभारण्यावर मर्यादा आहेत. या पार्श्वभूमीवर सूक्ष्म आणि संरक्षित सिंचन सुविधांवर शासनाने भर दिला आहे. यात धडक सिंचन विहिरी तसेच मागेल त्याला विहिरी आणि जलयुक्त शिवार अंतर्गत असणाऱ्या कामांवर भर देण्यात आला आहे. 11 हजार सिंचन विहिरींच्या कामकाजाबाबत तालुकानिहाय आढावा मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी घेतला. सुरु असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिले.

घरकूल योजना

घरकूल योजना तसेच स्वच्छ महाराष्ट्र या कार्यक्रमातून सर्वांपर्यंत विकास पोहोचणार आहे. या कामात सर्वांनी वैयक्तिक लक्ष घालून काम करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

श्री.नायक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी सादरीकरण केले. अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी आभार मानले.

वनसंपत्तीची पाहणी

मुख्यमंत्र्यांचे प्रारंभी अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात हेलिकॉप्टरने आगमन झाले. येथे पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यासमवेत बैठकीत जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला.

बैठकीच्या ठिकाणी आल्यावर वन विभागाच्या सेवेत असणारी हत्तीण जयलक्ष्मी आणि हत्ती विजय याच्याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. याठिकाणी घोट येथून आलेल्या आदिवासी पथकाने पारंपरिक आदिवासी नृत्याने मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. वनविभागाच्या गडचिरोली अगरबत्ती प्रकल्प तसेच इतर वन उत्पादनांचे स्टॉल येथे लावण्यात आले होते. त्या स्टॉलना भेट देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पाहणी केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा