महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
केंद्रप्रमुख शैक्षणिक नेतृत्व विकास कार्यक्रमात केंद्रप्रमुखाने ‘शिक्षणदूत’म्हणून काम करावे - शिक्षणमंत्री विनोद तावडे गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८

मुंबई : केंद्रप्रमुख शैक्षणिक नेतृत्व विकास कार्यक्रमात कार्यरत असताना केंद्र प्रमुखांनी प्रशासकीय अधिकारी नाही तर शिक्षणदूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केले.

केंद्रप्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम येथील हॉटेल विवांता येथे आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. तावडे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव डॉ. वंदना कृष्णा , महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. सुनील मगर, उपसंचालक नेहा बेलसरे, युनिसेफ महाराष्ट्रच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, युनिसेफच्या शिक्षण विभागाच्या भारतातील प्रमुख युफ्रेंटस ओसी, युनिसेफच्या महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ डॉ. रेश्मा अग्रवाल तसेच राज्यातील गटशिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख उपस्थित होते.

यावेळी  श्री. तावडे म्हणाले, केंद्रप्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम सुरु झाल्यापासून महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्रात प्राथमिकस्तरावर प्रगती केली आहे. माध्यमिक स्तरावर आणखी प्रगती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र प्रमुखाने अध्ययन निश्चितीसाठी पायाभूत विश्लेषण करावे. शेवटच्या पातळीवरील विद्यार्थ्याची आकलन क्षमता वाढेल आणि शैक्षणिक विकास होईल याकडे लक्ष द्यावे.

विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी शिक्षकांनी कसे शिकवावे याबाबत शासनाने वेळोवेळी नियम केले आहेत. युनिसेफही त्याचप्रमाणे काम करीत आहे. केंद्र प्रमुखाने आपल्यातील शिक्षक सतत जागा ठेवून मुलांना अधिकचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा. त्याच बरोबर प्रभावी निरीक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी योग्य कृती आराखडा तयार करावा. त्यामुळे आपल्याला शैक्षणिक प्रगती साधता येईल.

श्री. तावडे यांच्या हस्ते केंद्रप्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रमाचे सादरीकरण आणि कार्यक्रम पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर राज्यातील केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व उपक्रमातील 18 तज्ज्ञ सुलभक (मास्टर फॅसिलिटेटर) यांना बॅज लावून सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री. तावडे यांनी तज्ज्ञ सुलभक यांना प्रत्यक्ष काम करण्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्याचे निराकरण करण्याचे आश्वासनही दिले.

डॉ. मगर आणि श्रीमती बेलसरे यांनी केंद्रप्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रमाचे उद्द‍िष्ट, कार्यक्रमाचा आराखडा यांचा आढावा घेतला. युनिसेफच्या श्रीमती ओसी यांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा