महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी विविध बाबींवर कालबद्ध कार्यवाहीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश सोमवार, १६ एप्रिल, २०१८
निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

मुंबई :
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग उभारणीसाठी आवश्यक विविध बाबींवर कालबद्ध कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.राजीव कुमार यांच्या उपस्थितीत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

बैठकीत या प्रकल्पाशी निगडित विविध बाबींवर जिल्हानिहाय आढावा सादर करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस तसेच डॉ. राजीव कुमार यांनी चर्चा केली. प्रकल्पासाठी आवश्यक अशा विविध बाबींवर कार्यवाही वेळेत व्हावी यासाठी कालबद्ध नियोजन करावे. संपादित जमिनींचा मोबदला तातडीने देण्यात यावा. अन्य प्रशासकीय बाबी, मान्यता बाबतीतही वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

बैठकीस मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस.मदान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशनचे अधिकारी यू.पी.सिंह, पंकज उके, राजेंद्र प्रसाद आदींची उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा