महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
मलेशियाच्या बांधकाम मंत्रालयाचे सचिव जोहरी अकोब यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सोमवार, १७ जुलै, २०१७
मुंबई : मलेशियाच्या बांधकाम मंत्रालय (मिनिस्ट्री ऑफ वर्क)चे सचिव झोहरी हाजी अकोब यांनी आज शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी नागपूर मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली.

शिष्टमंडळात मलेशियाचे भारतातील राजदूत हिदायत अब्दुल हमीद, सीआयडीबी होल्डिंगचे चेअरमन जुडीन अब्दुल करीम, मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल लतिफ हितम, विशेष अधिकारी मासून अहामद, माट्रेडचे व्यापार आयुक्त माझलान हारून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (कार्य) ए. ए. सांगणे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्याच्या दृष्टीने नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. आम्ही हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेळेवर पूर्ण करणार आहोत. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा मोबदला देण्यात आला आहे. या एका रस्त्यावर होणारी गुंतवणूक सुद्धा मोठी आहे.

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामुळे 24 जिल्हे हे जोडले जाणार आहेत. तसेच राज्यातील विविध भाग हे जवाहरलाल नेहरू पोर्टशी जोडले जाणार आहेत. तसेच रस्त्याबरोबरच या मार्गावर गॅस पाईपलाईन, इंधनाची पाईपलाईनही टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गामुळे विविध व्यापार क्षेत्रे खुली होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

या प्रकल्पात सहभागामुळे महाराष्ट्र व मलेशिया यांच्यामधील संबंध आणखीन दृढ होणार आहेत. या महामार्गासाठी मलेशियाच्या सहकार्याने चांगले मॉडेल तयार करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

श्री.अकोब म्हणाले की, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी काम करण्यास आम्ही इच्छुक आहे. अतिशय चांगला प्रकल्प असून राज्य शासनाबरोबर काम करण्यात आनंद वाटेल.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा