महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात जर्मनीने गुंतवणूक वाढवावी - उद्योगमंत्री सुभाष देसाई शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८
जर्मन शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्र्यांची भेट

मुंबई :
जर्मनीतील अनेक नामांकित कंपन्या भारतामध्ये कार्यरत असून येत्या काळात जर्मनीने भारतामध्ये लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

जर्मनीच्या शिष्टमंडळाने आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये उद्योग, गुंतवणूक आदी विषयावर चर्चा झाली. यावेळी जर्मन पार्लमेंट सेक्रेटरी ख्रिश्चन हिरटे उपस्थित होते.

भारत जर्मनीमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे अनेक जर्मन कंपन्या भारतात कार्यरत आहे. भविष्यात देखील उद्योग वाढीसाठी जर्मनी भारतासोबत सलोख्याचे संबंध ठेवू इच्छितो, असे यावेळी शिष्टमंडळाने नमूद केले. मुंबईतील बीकेसी परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे हब सेंटर उभारण्याचा मानस जर्मनीच्या शिष्टमंडळाने व्यक्त केला. त्याला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.

जर्मनीतील अनेक कंपन्या भारतामध्ये सध्या कार्यरत असल्या तरी या पुढील काळात काही कंपन्यांनी लघु, व मध्यम उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढवण्याची सूचना उद्योगमंत्री देसाई यांनी केली. वस्रोद्योग, नवीन तंत्रज्ञान, मार्केटिंग तसेच ब्रॅण्ड बिल्डिंगसाठी जर्मनीने प्रयत्न करावेत, असे यावेळी देसाई यांनी जर्मनीच्या शिष्टमंडळास सांगितले. त्यास जर्मन शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.

तसेच जर्मन कंपन्या राज्यातील काही प्रकल्पांचा विस्तार करण्यास इच्छुक असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. त्यास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन श्री.देसाई यांनी दिले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा