महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
मिसिसिपीच्या गव्हर्नरनी घेतली राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
मुंबई : मिसिसिपीचे गव्हर्नर फिल ब्रायंत यांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजभवन येथे भेट घेऊन हवाई वाहतूक, ऑटोमोबाईल, कृषी उत्पादन, पर्यटन आदी विषयांवर चर्चा झाली.

यावेळी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी उपस्थित होते. श्री. ब्रायंत यांच्या शिष्टमंडळात सल्लागार जॉन बॉयकीन, आंतरराष्ट्रीय उद्योग संचालक रोसेस बॉक्स, अँडी गिप्सन यांचा समावेश होता.

राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्राची माहिती देऊन सांगितले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी उत्पादन दुप्पट करण्यास प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रात मोठा वाव आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मिसिसिपीमधील पर्यटकांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी तेथे रोड शो आयोजित करण्यात येईल. हवाई वाहतूक विषयाचे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. यामुळे अनेक उद्योजक येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हे फलोत्पादन निर्यात क्षेत्रात आघाडीवर आहे. कृषी उत्पादन वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून त्यासाठी मिसिसिपीचे सहकार्य होईल. तसेच हवाई वाहतूक , पर्यटन क्षेत्रातही मिसिसिपी व महाराष्ट्र यामध्ये परस्पर सहकार्य होईल.

श्री. ब्रायंत म्हणाले, महाराष्ट्र व मिसिसिपी यांच्यातील चर्चेमुळे दोन्ही राज्यात संबंध वृद्धिंगत होण्यास मदत होईल. ही एक मोठी संधी आहे. हवाई वाहतूक, वाहन उत्पादन, कृषी क्षेत्रात आमच्याकडे मोठे संशोधन झाले आहे. याचा फायदा महाराष्ट्राला होईल. मिसिसिपी राज्य हे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करत आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा