महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
व्यापार व गुंतवणूक प्रदर्शनातून भारत-अफगाणिस्तानमध्ये सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत - उद्योगमंत्री सुभाष देसाई बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
मुंबई : आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूक प्रदर्शनातून भारत-अफगाणिस्तान देशांमधील राजकीय व आर्थिक हितसंबंध अधिक दृढ व्हावेत तसेच या निमित्ताने दोन्ही देशांत शांती व स्थैर्य प्रस्थापित होऊन दोन्ही देशात सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

भारत, अमेरिका व अफगाणिस्तान सरकारच्या पुढाकाराने मुंबई येथे दुसऱ्या वार्षिक ‘पॅसेज टू प्रॉस्पॅरिटी’ भारत-अफगाण आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अब्दुल्ला-अब्दुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. अफगाणिस्तानचे अर्थमंत्री डॉ.मोहमंद हुमायू कयामी, अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील उच्चायुक्त जॉन बास, डेप्युटी चिफ मिशन, युएस कौन्सलेट मेरी के कार्लसन, मुंबई टाटा पॉवरचे सीईओ प्रवीण सिन्हा आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री.देसाई पुढे म्हणाले, जगभरातील गुंतवणूकदार भारताला पसंती देत आहेत. त्यात महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती मिळत असून या प्रदर्शनाद्वारे भारतात येणारी गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. या प्रदर्शनासाठी अमेरिकेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.

अफगाणिस्तानची प्रगती व्हावी, अशी अमेरिकेला अपेक्षा आहे, त्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचे उच्चायुक्त जॉन बास यांनी सांगितले. अफगाणिस्तान व्यापार व गुंतवणुकीसाठी खुला असून अफगाणिस्तानची सर्वांगिण प्रगती व्हावी, अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरक्षा मुद्दा ऐरणीवर असला तरी त्यातून मार्ग काढून अफगाणिस्तानची प्रगती साधण्यासाठी अमेरिका व भारत प्रयत्न करत असल्याचे बास यांनी सांगितले.

यावेळी अब्दुल्ला-अब्दुल्ला म्हणाले, आम्ही या ठिकाणी निकोप व्यापार करण्यासाठी आलो आहोत. गेल्या वर्षी दिल्ली येथे असाच कार्यक्रम घेण्यात आला. त्याद्वारे 200 मिलीयन डॉलरचे करार करण्यात आले. मुंबईतील प्रदर्शनातून यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट किंमतीचे करार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी, ऊर्जा, आरोग्य आदी क्षेत्रात दोन्ही राष्ट्रांना काम करण्यासाठी मोठा वाव आहे. लघु-मध्यम उद्योग व महिला उद्योजकांसाठी काम करण्यासाठी अनेक क्षेत्र असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक अडचणी असताना आम्ही दोन्ही देशातील व्यापार वाढवण्यासाठी कटिबद्ध आहोत.

यावेळी मेरी के कार्लसन म्हणाल्या, प्रत्येक देशात रोजगार वाढवण्यासाठी व्यावसायिक भागिदारी वाढवण्याची आवश्यकता आहे. अफगाणिस्ताच्या शांती, स्थैर्यासाठी भारताकडून होत असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे असल्याचे त्या म्हणाल्या.

या प्रदर्शनामध्ये अमेरिका, भारत, अफगाणिस्तासह इतर देशातील सुमारे दोन हजार व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये अफगाणिस्तानमध्ये 200 व्यापारी असून भारतातील एक हजार दोनशे व्यापारी, तसेच इतर देशातील गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. याशिवाय 100 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. अफगाणिस्तानमधील मौल्यवान रत्न, गालिचे, वस्त्र, खाद्यपदार्थ, आणि इतर दर्जेदार वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. हॉटेल जे. डब्ल्यू मेरिएट, सहार, अंधेरी येथे हे प्रदर्शन चार दिवस चालणार असून सर्वांसाठी खुले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा