महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
समृध्दी महामार्गासाठी मलेशिया करणार सहकार्य - एकनाथ शिंदे सोमवार, १७ जुलै, २०१७
मुंबई : नागपूर- मुंबई द्रुतगती समृध्दी महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी मलेशिया सरकारने दाखविली आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मलेशियाच्या एका शिष्टमंडळाने आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी समृध्दी महामार्गाची माहिती दिली.

श्री. शिंदे म्हणाले, भारत आणि मलेशियाचे फार जुने संबंध असून विविध क्षेत्रात त्यांनी सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवला आहे. विशेषत: रस्ते, पूल, भुयारी मार्ग कामात त्यांनी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून मजबूत आणि सुरक्षित रस्ते तयार केले आहेत. समृध्दी महामार्ग हा महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पात काम करण्याची मलेशियाने तयारी दाखवली ही आनंदाची गोष्ट आहे. समृध्दी महामार्गाबरोबरच अन्य रस्त्यांच्या प्रकल्पात देखील सोबत काम करु असेही त्यांनी सांगितले.

समृध्दी महामार्गाचे सादरीकरण पाहून खूपच प्रभावित झाल्याचे मलेशियाच्या बांधकाम मंत्रालयाचे सचिव श्री. झोहारी हाजी अकोब यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला मलेशियाच्या बांधकाम मंत्रालयाचे विशेष अधिकारी मसून अहमद, बांधकाम विभागाचे उपसचिव अझमान इब्राहिम, बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सचिव अजित सगणे, सह कार्यकारी संचालक किरण कुरुंदकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा