महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
स्वीडनच्या पंतप्रधानांशी मुख्यमंत्र्यांची विविध क्षेत्रातील सहकार्य संवर्धनाबाबत सकारात्मक चर्चा गुरुवार, १२ ऑक्टोंबर, २०१७
  • स्मार्ट सिटी, घनकचरा व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनास लाभ होणार
  • बिझनेस लीडर्स कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे संबोधन
  • वाहतुकीसाठी बायोगॅस सुविधेबाबत स्कॅनियाचे सहकार्य
  • राज्यातील नागरी उड्डाण क्षेत्रात मदतीची सॅबची तयारी
मुंबई : स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान तसेच घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य वाढविण्याबाबत स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा झाली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ स्वीडनच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी बुधवारी स्टॉकहोम येथे पोहोचले. या शिष्टमंडळाने दौऱ्याच्या पहिल्या दिवशी विविध उद्योगसमूह तसेच मान्यवरांशी संवाद साधला. त्यात स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांच्याशी झालेली चर्चा विशेष महत्त्वाची होती. स्वीडीश उद्योगसमुहांना भारतात अधिकाधिक गुंतवणूक करणे शक्य असलेल्या क्षेत्रांसह त्यासाठी महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती श्री. लॉफवेन यांना यावेळी देण्यात आली. स्मार्ट सिटीच्या विकासासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य करण्याबाबतही श्री. लॉफवेन यांची मुख्यमंत्र्यांशी अतिशय चांगली चर्चा झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील संधींची परिषदेत माहिती

भारत आणि स्वीडन बिझनेस लीडर्स राऊंड टेबल या परिषदेला श्री. फडणवीस यांनी संबोधित करताना महाराष्ट्रात गुंतवणुकीसह औद्योगिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधींची विस्ताराने माहिती दिली. भारतातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्र बजावत असलेली आघाडीची भूमिका, देशात येणाऱ्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी राज्यात झालेली निम्मी गुंतवणूक, सर्वाधिक संख्येने होत असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प, डिजिटलायझेशनच्या अमाप संधी आदींबाबत त्यांनी उपस्थितांना अवगत केले. स्वीडनकडे असलेले तंत्रज्ञान आणि महाराष्ट्रातील उपलब्ध संधी यांचा सुयोग्य मेळ घातल्यास या क्षेत्रात व्यापक सहकार्य होऊ शकते. तसेच यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन राज्याच्या डिजिटलायझेशनसाठी व्यापक आराखडा तयार करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात निर्माण होत असलेल्या स्मार्ट सिटी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि एकात्मिक सार्वजनिक वाहतूक प्रकल्प तसेच संरक्षण उत्पादन क्षेत्र आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कार्य करण्याची गरज इत्यादी विषयांवर या परिषदेत चर्चा झाली. केंद्रीय मंत्री श्री. प्रभू यांच्यासह दोन्ही देशातील आघाडीच्या उद्योगसमुहांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्कॅनिया समुहाशी सकारात्मक चर्चा

स्कॅनिया समुहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मॅथियास कार्लबूम यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीत काम करणारा स्कॅनिया हा स्वीडनमधील सर्वांत मोठा उद्योगसमूह आहे. नागपूर शहरात सध्या कार्यरत असलेल्या या समुहाने राज्यातील इतर शहरांमध्ये वाहतुकीसाठी बायोगॅस सुविधा क्षेत्रात काम करण्याची तयारी यावेळी दर्शविली. राज्यात याबाबतच्या देखभाल सुविधा तसेच तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास देखील या समुहाने सहमती दर्शविली. राज्य सरकार अनेक मोठ्या शहरांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवित आहे. त्या माध्यमातून बायोफ्युएल वाहनांच्या किंमती कमी करण्याच्या गरजेबाबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून 97 टक्के मिथेन तयार होईल आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक स्वच्छ इंधनावर चालविण्यासाठी तो उपयोगी ठरेल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

नागरी उड्डाण क्षेत्रात मदतीची सॅबची तयारी

उड्डाण आणि संरक्षण क्षेत्रातील सॅब उद्योग समुहाने या क्षेत्रातील सुविधांसोबत संबंधित संपूर्ण यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणण्याची तयारी या उद्योगसमुहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हॅकन बुश्खी यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत दर्शविली. नागरी सुरक्षेच्या क्षेत्रातही हा समूह कार्यरत आहे. औद्योगिक सहभागिता विभागाचे उपाध्यक्ष मॅट्स पॅलोनबर्ग हे यावेळी उपस्थित होते. सॅब कंपनीला राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन देतानाच महाराष्ट्रात असलेल्या उत्तम मनुष्यबळाची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. सॅबच्या पथकाने गेल्याच आठवड्यात नाशिक आणि नागपूर येथे भेटी दिल्या असून भारतात सध्या घडत असलेल्या सकारात्मक बदलांबाबत प्रशंसा केली. विशेषत: स्वच्छ भारत अभियानाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा