महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
क्रीडा विभागामार्फत आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शुक्रवार, १९ मे, २०१७
मुंबई : राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य क्रीडा संचालनालयामार्फत देण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

क्रीडा संचालनालयामार्फत 14 अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशिएन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप आणि वर्ल्ड कप) सहभागी झालेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य देण्यात येते. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या खेळ/क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ/क्रीडा प्रकार वरील नमुद इतर स्पर्धांमध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय होतील. मात्र अपवाद कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद उपरोक्त शासन निर्णयान्वये करण्यात आलेला आहे.

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडाविषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख याबाबी विचारात घेऊन क्रीडा धोरण 2012 तयार करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादी देण्यात येईल. देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क देण्यात येईल. तसेच आधुनिक क्रीडा साहित्य आयात/खरेदी करणे, गणवेश इत्यादीही क्रीडा संचालनालयामार्फत देण्यात येईल.

उपरोक्त विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रासह संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन डॉ.विजय झाडे, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आपले जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय किंवा क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळूंगे-बालेवाडी, पुणे येथील कार्यालयाशी संपर्क करावा, (दूरध्वनी क्र.020-27390371 विस्तारीत क्र.214) असे उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा