महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
पद्मश्री अरुणिमा सिन्हा यांच्या अकॅडमीसाठी सर्वतोपरी सहकार्य- मुख्यमंत्री मंगळवार, ०२ जून, २०१५
मुंबई : पद्मश्री अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनाची संघर्ष कथा युवापिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी असून अपंगासाठी अकॅडमी सुरु करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

माजी सनदी अधिकारी प्रभाकर करंदीकर लिखित 'फिरुनी नवी जन्मले मी' या पद्मश्री अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनावरील पुस्तकाचे तसेच ई-बुकचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बीव्हीजी इंडिया लि. चे अध्यक्ष हनुमंत गायकवाड, प्रफुल्लता प्रकाशनाचे गुलाब सपकाळ, पद्मश्री अरुणिमा सिन्हा, लेखक प्रभाकर करंदीकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अरुणिमा सिन्हा यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. हे कार्य अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे.

विनोद तावडे म्हणाले की, हे पुस्तक जो वाचेल त्याला स्वत:चा नवीन जन्म झाल्यासारखे वाटेल इतके हे पुस्तक प्रेरणादायी आहे. अनेकांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून होईल. ही कथा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केलेल्या हृदयस्पर्शी मनोगताने उपस्थितांना भारावून टाकले. प्रास्ताविक प्रभाकर करंदीकर यांनी तर आभार गुलाबराव सपकाळ यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा