महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ‘जय हे’ संग्रहालयाचे पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन शुक्रवार, १९ मे, २०१७
विदेशी पर्यटकांना होणार भारतीय संस्कृतीचे दर्शन

मुंबई :
देश-विदेशातील पर्यटकांना भारतीय संस्कृती जवळून अनुभवता यावी यासाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जागतिक संग्रहालय दिनानिमित्त ‘जय हे’ म्युझियम सफारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते गुरूवारी उद्घाटन करण्यात आले.

टर्मिनल 2 येथे भव्य असे चार पातळ्यांवर संग्रहालय उभारण्यात आले असून येथे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी कलाकृती ठेवण्यात आली आहे. 18 मे रोजी जागतिक संग्रहालय दिवस साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून जीव्हीके एमआयएएल (मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लि.) यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आठवडाभर जय हे म्युझियम सफारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या विमानतळावरून नेहमी मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक भारतात दाखल होतात. त्या पार्श्वभूमीवर या पर्यटकांना भारतीय संस्कृतीची, प्राचीन कलेची जवळून ओळख व्हावी, त्यांना तो अनुभव घेता यावा, भारतीय संस्कृती, कला सातासमुद्रापार जावी या उद्देशाने या उपक्रमाअंतर्गत टर्मिनल 2 येथे भव्य असे संग्रहालय उभारण्यात आले आहे. यात देशभरातील 100 कलाकारांच्या तब्बल 7 हजार कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. या कलाकृतींमधून भारतीय संस्कृती व पारंपरिक कलेचे दर्शन होते.

दरम्यान, या उपक्रमातून व प्रदर्शनातून भारतीय संस्कृती विदेशात पोहोचण्यास मदत होईल, असे मत पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पर्यटन मंत्र्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. विविध पारंपरिक कला प्रकारांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. केवळ पर्यटकांना माहितीसाठी नव्हे, तर या उपक्रमाच्या माध्यमातून हस्तकलेसह विविध पारंपरिक कलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे आयोजकांनी सांगितले. हे प्रदर्शन देश-विदेशातील पर्यटकांसाठी एक पर्वणी असून यातून भारतीय संस्कृती देश विदेशात जाईल, भारतातील पारंपरिक कला पर्यटकांमार्फत विदेशात पोहोचतील व यातून कलेला मोठा वाव मिळेल. पारंपरिक कला समृद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा