महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
वीज वितरण हानी ३ टक्क्यांवर आणा, अन्यथा वेतनवाढ रोखणार - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार, १० जानेवारी, २०१९
भांडूप येथे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा आणि तक्रारींबाबत आढावा बैठक




मुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडळ झोनच्या सर्व विभागातील वीज वितरण हानी येत्या महिन्याभरात ५ टक्क्यापर्यंत आणा. ज्या ठिकाणी ५ टक्के वितरण हानी आहे, तेथे हे प्रमाण तीन टक्क्यांवर आले पाहिजे. अन्यथा कर्मचारी अभियंत्यांच्या तीन वेतन वाढी गोठवण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.

भांडूप येथे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा आणि तक्रारींबाबत आढावा बैठक ऊर्जामंत्र्यांनी आज घेतली. या बैठकीत ग्राहकांना मिळणाऱ्या सर्व सेवा ऑनलाईन झाल्या पाहिजे तसेच लघुदाब ग्राहकांच्या वीज जोडण्या महिनाभरात पूर्ण करण्यावरही ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी भर दिला. या बैठकीला कोकण विभागाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे, कार्यकारी संचालक येरमे मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण उपस्थित होत्या.

सुमारे २४ लाखांपेक्षा अधिक ग्राहक असलेल्या भांडूप परिमंडळात १० टक्के वीज वितरण हानी आहे. ही हानी ५ टक्क्यांवर आली पाहिजे. एकही कृषिपंप कनेक्शन नसताना एवढी हानी नको, वीज वितरण हानी ही तीन टक्क्यांपर्यंत आणण्याचे प्रयत्न करावे. असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

वीज हानीचा सर्वंकष आढावा घेताना ठाणे, कळवा, मुंब्रा, येथे सर्वाधिक हानीचे आकडे समोर आले. ज्या ठिकाणी १० टक्के हानी आहे तेथे ५ टक्के, ज्या ठिकाणी ५ टक्के वितरण हानी आहे, तेथे तीन टक्क्यांवर प्रमाण आले पाहिजे. या बैठकीत सौभाग्य योजनेतील सर्व कनेक्शन पूर्ण असल्याची माहितीही सांगण्यात आली. ज्या भागात महावितरणची वीज अजून पोहोचली नाही तेथे यंत्रणा कधी पोहोचणार याचे नियोजन करुन शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

आय.पी.डी.एस. भाग एकचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून भाग दोन मधील ६० टक्के कामे झाली आहेत. दीनदयाल योजनेत १२० कोटींची कामे झाली असून उर्वरीत कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण करावीत अशा सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. ३१ मार्चपर्यंतच्या आर्थिक वर्षात ज्या अधिकाऱ्यांनी दिलेला निधी खर्च केला नाही, त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्रवाई केली जाईल. भांडूप परिमंडळात २५० कोटींची कामे सुरु असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

वीज जोडणीसाठी अर्जाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी. सर्कल ते डिव्हिजनमधील कनेक्शनची प्रक्रिया ७ दिवसात पूर्ण व्हावी. कनेक्शनसाठी ग्राहकांनी महावितरण कार्यालयात येण्याची गरज नाही, असे निर्देश देताना ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल जीपीएस सिस्टम सुरु ठेवण्याच्या सूचनाही दिल्या.

उच्चदाब व लघुदाब ग्राहकांच्या जोडण्या प्रलंबित कशामुळे आहेत याची कारणे सांगा. जोडणीसाठी आवश्यक असलेली सर्व कामे झाल्याशिवाय अर्ज स्वीकारु नका, असे निर्देश देताना ऊर्जा मंत्री म्हणाले मीटर मिळत नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मीटर नाही म्हणून जोडणी नाही अशी स्थिती नको. महिनाभरात सर्व पेडपेंडीग जोडण्या पूर्ण झाल्या पाहिजेत.

फक्त उच्चदाब ग्राहकांचे मीटर टेस्टिंग केल्या जातात, लघुदाब ग्राहकांचे मीटर टेस्टिंग होत नसल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. मीटर टेस्टिंग विभागाची प्रक्रियाही ऑनलाईन नाही. ग्राहकांशी संबंध येत असलेल्या सर्व सेवा ऑनलाईन करा. तांत्रिक मंजुरीची प्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीने करा.

भांडूप झोन मधील २४ लाख ग्राहकांपैकी फक्त ९ लाख ५५ हजार ग्राहकांकडे मोबाईल ॲप आहे. येत्या ३१ मार्च पर्यंत सर्व ग्राहक मोबाईल ॲपने जोडले जाण्याच्या सूचना देताना ऊर्जामंत्री म्हणाले फीडर ट्रीपिंगला प्रशासकीय कार्यवाहीशी जोडण्यात यावे. वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ५०० कोटींची योजना तयार करावी. भांडूप झोन मधील वाड्या वस्त्यांमध्ये सोलरपंपाची मागणी असल्यास त्याची यादी तयार करा. ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयांची वीजेची मागणी लक्षात घेऊन त्या कार्यालयांस सौरऊर्जेची वीज देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा