महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
प्रवासी व पोलीस यांच्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई - परिवहन मंत्री दिवाकर रावते गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८
मुंबई : कल्याण रेल्वे स्थानक येथे रिक्षा चालकाकडून वाहतूक विभागाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासंबंधी घडलेल्या घटनेची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी तातडीने दाखल घेतली. या परिसरातील प्रवासी तसेच पोलीस यांच्याशी उर्मट, उद्धट वागणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले.

वाहतूक विभागाच्या महिला कर्मचारी आशा गावडे या आपले कर्तव्य बजावत असताना रिक्षा चालकांकडून त्यांनी परवाना मागितले, त्या वेळेस परवाना न देता रिक्षा चालकाने महिला कर्मचाऱ्यास फरफटत नेले. या घटनेची दखल परिवहन मंत्री श्री. रावते यांनी घेत रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले.

रिक्षा चालकांच्या विरुद्ध वारंवार उद्धट वर्तन, भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे, विना परवाना, विना बॅच, विना परवाना चालविण्याचे तक्रार होत असल्यास कल्याण-डोंबिवली भागातील रिक्षा चालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या मोहिमेअंर्गत आजपर्यंत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी १०२५ रिक्षा चालकांची तपासणी केली. या १०२५ रिक्षा पैकी १८४ रिक्षा चालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. पैकी ६० वाहने ताब्यात घेतली आहेत.

या मोहिमेसाठी परिवहन विभागाच्या ठाणे, पनवेल, मुंबई पूर्व व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण व वसई येथील वायुवेगपथकामार्फत १० पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ज्या वाहनांना परवाने नसतील त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार वाहन मालक तसेच परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा