महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
निवडलेल्या करिअरबाबत चिकाटीने काम केल्यास ओळख मिळेल - सर रिचर्ड जॉन रॉबर्टस शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९

मुंबई : आपण निवडलेल्या करिअरबाबत लोक काय म्हणतील, करिअरमध्ये यश मिळेल की नाही याचा विचार करण्यापेक्षा निवडलेल्या क्षेत्रात चिकाटीने काम करीत राहिलात तर तुमच्या कामामुळे तुम्हाला ओळख मिळेल, असे प्रख्यात नोबल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस यांनी दीक्षांत समारंभाच्या वेळी बोलताना सांगितले.

प्रख्यात नोबल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज फोर्ट येथील मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरु रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलसचिव डॉ.सुनील भिरुड, डॉ.अर्जुन घाटुळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रख्यात नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस यावेळी बोलताना म्हणाले, मी केलेल्या कामाबाबत मला सन्मान मिळेल की नाही यापेक्षा मला माझ्या नोबेल पारितोषिकामुळे वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो. समाजासाठी काय काम करणे आवश्यक आहे हे समजणे ही मोठी गोष्ट आहे. आजचे विद्यार्थी हे हुशार असून योग्य संधी कशी निवडायची हे माहीत आहे. मात्र असे जरी असले तरी आपल्या पारितोषिकाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी होणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा

नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस यावेळी म्हणाले, आपल्या आयुष्यात आपल्याला मिळालेली संधी जितकी महत्त्वाची असते तितकीच तुम्हाला वेळोवेळी नशीबाने दिलेली साथही महत्त्वाची ठरते. आपण आपले काम चिकाटीने करीत राहिलो की वेगवेगळ्या संधी समोर येतात त्यावेळी मात्र जिद्दीने आपले पॅशन आपल्याला पूर्ण करता आले पाहिजे. आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे हे आजच्या विद्यार्थ्यांनी ओळखणे आवश्यक आहे. जे ठरवले आहे ते साध्य करण्यासाठी निश्चित ध्येय असेल तर आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे आपण संधी पाहतो. त्यामुळे दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.

आपली आवड ओळखा

नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस स्वत:बाबत सांगताना म्हणाले, लहानपणापासूनच मला कोडे, वेगवेगळे खेळ आणि गणिताची आवड होती. थोडे मोठे झाल्यावर आपण डिटेक्टिव्ह व्हावे असे वाटू लागले. अजून पुढे मोठे झाल्यावर रसायनशास्त्राची आवड निर्माण झाली आणि मग याच रसायनशास्त्रात पुढे‍ शिकत जाऊन ऑर्गनिक केमिस्ट्रीमध्ये मी पी. एच. डी. पूर्ण केली. मी हॉवर्ड विद्यापीठात प्रवेश न घेता नशीबाने विसकोनसिन विद्यापीठात शिकायला गेलो आणि मी माझ्या विद्यापीठाचा पहिला विद्यार्थी आहे की ज्याला नोबेल पारितोषिक मिळाले आहे. येणाऱ्या काळात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना नोबेल पारितोषिक मिळावे अशी माझी इच्छा आहे.

खेळाला महत्त्व द्या

नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सल्ला दिला, आपल्याला आवडत असलेल्या खेळाला पुढे घेऊन जा कारण याच खेळामुळे तुमचे मन स्वस्थ राहण्यास मदत होते. दररोज काहीतरी नवीन शिकायचे आहे हे ठरवले तर तुमचे व्यक्तीमत्व प्रभावी बनत जाते. खेळामुळे तुमचे मन, शरीर तंदुरुस्त राहते.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.सुहास पेडणेकर यांनी यावेळी सांगितले, क्यूएस भारतीय विद्यापीठाच्या श्रेणी यादीत पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ महाराष्ट्रात पहिल्या तर भारतात चौथ्या क्रंमाकावर आहे. संशोधन ही देशाच्या आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे. विद्यापीठ विभागांमध्ये एकूण 82 मान्यताप्राप्त पी. एच.डी. धारक तयार झाले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक्‍ टॉवरला सांस्कृतिक वारसा जतन करण्याबद्दल नुकताच ए‍‍शिया पॅसिफिक पुरस्कार मिळाल्याचेही सांगितले.

आज झालेल्या दीक्षांत समारंभात विविध विद्या शाखांतील 1 लाख 93 हजार 589 स्नातकांना पदव्या देण्यात आल्या. 332 स्नातकांना पी.एच.डी. आणि एम फिल तर 52 विद्यार्थ्यांना पदके देण्यात आली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन करण्यात आले. तर 13 जानेवारी 2019 रोजी मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा