महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या निधनाने मराठी रंगभूमी - चित्रपट क्षेत्राची मोठी हानी - सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे शुक्रवार, ०९ नोव्हेंबर, २०१८


मुंबई :
‘सखाराम बाईंडर’, ‘कमला’, ‘रथचक्र’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार नाटकांमध्ये आणि ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’ सारख्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या निधनाने मराठी रंगभूमी - चित्रपट क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी लालन सारंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात श्री. तावडे यांनी म्हटले आहे की, विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाईंडर, कमला या गाजलेल्या नाटकांमधून कमला आणि चंपा या दोन व्यक्तिरेखा अत्यंत धाडसाने साकारणाऱ्या लालन सारंग यांनी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला, मराठीबरोबरच हिंदी नाटकांमध्येही त्यांनी अभिनय केला, मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. कणकवली येथे झालेल्या ८७ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले होते. आपल्या दर्जेदार अभिनयाने मराठी रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या लालन सारंग यांच्या निधनामुळे रंगभूमीने अष्टपैलू व्यक्तिमत्व गमावले आहे, असेही श्री. तावडे यांनी शेवटी म्हटले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा