महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
आपत्त्कालीन परिस्थितीत राज्याचे आपत्ती प्रतिसाद दल सज्ज गुरुवार, १२ ऑक्टोंबर, २०१७
मंत्रालयात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके
मुंबई
: जागतिक आपत्ती निवारण व व्यवस्थापन दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित प्रदर्शनाचे व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या लोगोचे अनावरण मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एका विशेष समारंभात झाले. यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना अचंबित केले.

राज्याचे आपत्ती प्रतिसाद दल हे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या धर्तीवर सक्षम करण्यात येत असून कुठल्याही आपत्तीच्या निवारणासाठी हे दल सज्ज असल्याचे यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले.

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने 13 ऑक्टोबर या जागतिक आपत्ती निवारण दिनानिमित्त राज्यात 9 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन व निवारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आपत्ती काळात उपयोगी असणाऱ्या विविध सामग्री ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आपत्ती काळात घ्यावयाची काळजी यासंबंधी लोकांचे प्रबोधन व्हावे, यासाठी पथनाट्यांचे आयोजनही करण्यात आले आहे. पथनाट्य व प्रदर्शन शुक्रवारपर्यंत चालणार आहे. यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला देण्यात आलेल्या 28 नव्या वाहनांचे लोकार्पणही श्री. पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी श्री. पाटील म्हणाले की, आपत्ती येऊ नये, यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे. यासाठी आपत्ती निवारण जागृती सप्ताहात लोकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. नैसर्गिक अथवा इतर आपत्ती आल्यास निवारणासाठी राज्य शासनाचा मदत व पुनर्वसन विभाग सक्षम आहे. या विभागाच्या अंतर्गत असलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाप्रमाणे आधुनिक उपकरणांनीयुक्त सक्षम करण्यात येत आहे. तसेच या दलासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे आता कोणत्याही आपत्तीला तोंड देण्याची तयारी या दलाकडे आहे.

यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुख्य सचिवांचे सहसचिव सुरज मांढरे, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी आपत्ती काळात उंच इमारतीमधून नागरिकांची कशी सुटका करायची, प्राथमिक वैद्यकीय मदत तातडीने कशाप्रकारे द्यायची, उंच इमारतीत दोरीच्या सहाय्याने कसे जायचे आदींचे प्रात्यक्षिक दाखविले. मंत्रालयात उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा