महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
नीला सत्यनारायण लिखित ‘जाळ रेषा’ शासकीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक - राज्यपाल शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६
मुंबई : राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी लिहिलेले ‘जाळ रेषा’ हे पुस्तक शासकीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या ‘जाळ रेषा’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या पुस्तकाच्या लेखिका नीला सत्यनारायण, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी, अभिनेते नाना पाटेकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल पुढे म्हणाले, भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना श्रीमती सत्यनारायण यांनी ‘सत्यं वद धर्मं चर’ या उक्तीप्रमाणे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेले ‘जाळ रेषा’ हे पुस्तक राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी विशेषत: निवृत्त महिला अधिकाऱ्यांनी वाचण्यासारखे आहे. महाराष्ट्राला आधुनिक आणि प्राचीन साहित्याची उत्कृष्ट परंपरा लाभली आहे. येथील लोक उत्तम पुस्तकांवर प्रेम करतात. श्रीमती सत्यनारायण यांनी लिहिलेल्या ‘जाळ रेषा’ पुस्तकामुळे उत्तम पुस्तकांच्या यादीत भर पडली आहे. प्रशासनातील सर्व विभागामध्ये तसेच प्रशासकीय सेवेत त्याचबरोबर पोलीस सेवेतही अधिकाधिक महिलांचा समावेश असे सांगून राज्यपाल म्हणाले, त्यांच्यामुळे प्रशासनाची गुणवत्ता सुधारण्यास तसेच निर्णयप्रक्रियेत नक्कीच मदत होईल.

यावेळी श्रीमती नीला सत्यनारायण व नाना पाटेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा