महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘टाटा ओपन महाराष्ट्र टेनीस टुर्नामेंट’ क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरेल - मुख्यमंत्री बुधवार, ०६ डिसेंबर, २०१७
मुंबई : टेनीस क्रीडाप्रेमींसाठी बालेवाडी स्टेडियम येथे होणारी टाटा ओपन महाराष्ट्र टुर्नामेंट पर्वणी ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) या नामांकित क्रीडासंस्थेच्या वतीने बालेवाडी येथे 1 ते 6 जानेवारी दरम्यान होणाऱ्या एटीपी क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे (लोगोचे) अनावरण आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात पहिल्यांदा एटीपी या प्रतिष्ठित टेनिस स्पर्धेचे आयोजन होत आहे. भविष्यातही अशा क्रीडा स्पर्धेंचे आयोजन करायला आवडेल. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय नामांकित खेळाडुचा सहभाग असेल. नवोदित खेळाडूंसाठी या स्पर्धेतून प्रेरणा मिळेल. राज्याच्या क्रीडा इतिहासात या स्पर्धेच्या आयोजनाने नवा अध्याय लिहिला जाईल. बालेवाडी येथे असणाऱ्या क्रीडा सुविधांचा उपयोग चांगल्या पद्धतीने करण्यात यावा.

अदार पुनावाला क्लिनसिटी इनिसीएटिव्ह, महाराष्ट्र शासन, ऑल इंडिया टेनिस असोसिएशन व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांनी या स्पर्धेचे प्रायोजकत्व घेतले आहे. यावेळी या पत्रकार परिषदेला आयोजन समिती प्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन, बनमाली अग्रवाल, आयोजन समितीचे सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, संजय खंदारे, टुर्नांमेट डायरेक्टर प्रशांत सुतार उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा