महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ रविवारी सकाळी सह्याद्री, झी आणि साम वाहिनीवर शुक्रवार, १९ मे, २०१७
मुंबई : महाराष्ट्राची शिक्षणामधील आघाडी आणि भविष्यातील आव्हाने या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना स्पष्ट, निर्भीड आणि प्रामाणिक उत्तरे देणार आहेत. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाचा पहिला भाग येत्या रविवारी म्हणजेच दिनांक 21 मे रोजी सकाळी 10.00 वाजता झी 24 तास, सकाळी 10.30 वाजता सह्याद्री वाहिनी, झी मराठी आणि साम मराठी या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे.

या कार्यक्रमाचा दुसरा भाग दिनांक 28 मे रोजी प्रक्षेपित होईल. सह्याद्री दूरदर्शनवर या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवारी 22 मे रोजी संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे. राज्यातील विद्यार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यासाठी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विद्यार्थ्यांसाठी शालेय/महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील सुधारणा’ या‍ विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. शिक्षण व्यवस्थेतील वेगवेगळे प्रश्न, शिक्षण पद्धतीतले 10+2+3 हे असलेले सूत्र, आगामी काळात शिक्षणामध्ये होणारे बदल याबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रात होणारे बदल याबाबत केलेले मनोगत आणि विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद प्रेक्षकांना पहायला मिळेल.

आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या दिलखुलास या कार्यक्रमातही मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. सोमवार ते बुधवार म्हणजेच दिनांक 22 मे ते 24 मेपर्यंत एकूण तीन दिवस सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा