महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
मुंबई शॉपिंग महोत्सवातून पर्यटनाबरोबर अर्थव्यवस्थेला मिळेल मोठी चालना – मुख्यमंत्री शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
मुंबई : पर्यटन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई शॉपिंग महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईबरोबरच महाराष्ट्राच्या पर्यटनाला आणि येथील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बीकेसी येथील जिओ गार्डन येथे आज या महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार प्रसाद लाड, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा महोत्सव 12 ते 31 जानेवारी दरम्यान चालणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईचे आकर्षण जगभरात आहे. या शहराकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आयोजित केलेला हा महोत्सव निश्चित उपयुक्त ठरेल. या महोत्सवातून मुंबईचा एक ब्रँड प्रस्थापित होईल. दरवर्षी किमान एक महिना हा महोत्सव घेण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटनमंत्र्यांचे केले अभिनंदन

मुंबईच्या पर्यटन आणि अर्थव्यस्थेला चालना देणारी ही अभिनव संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले.

शॉपिंग महोत्सवाला महामहोत्सव बनवू - जयकुमार रावल

मंत्री श्री.रावल यावेळी म्हणाले की, मुंबईत रिक्षापासून विमानापर्यंत तर वडापावपासून पंचतारांकित हॉटेलापर्यंत 360 डिग्री पद्धतीने सुविधा उपलब्ध आहेत. शॉपिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, फूड स्टॉल अशा विविध माध्यमातून शॉपिंग महोत्सव हा सांस्कृतिक महोत्सवही होणार आहे. यापुढील काळात हा लोकोत्सव आणि महामहोत्सव बनविण्यात येईल, असे ते म्हणाले.

यावेळी एमटीडीसीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा