महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
विनीत अग्रवाल यांच्या ‘कलयुग की पूर्व संध्या’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
मुंबई : भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी तसेच सक्तवसुली संचालनालयाच्या पश्चिम विभागाचे विशेष महासंचालक विनीत अग्रवाल यांच्या ‘कलयुग की पूर्व संध्या’ (On the Eve of Kalyug) या द्विभाषिक पुस्तकाचे मंगळवारी (दिनांक १२) राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन येथे प्रकाशन झाले.

महाभारतातील युद्धाच्या अंतिम दिवशी घडलेल्या विविध घटनांचे वर्णन ‘कलयुग की पूर्व संध्या’ या पुस्तकात काव्यरुपाने करण्यात आले असून हे पुस्तक पोयेसिस सोसायटी फॉर पोएट्री यांनी प्रकाशित केले आहे.

‘महाभारत’ या महाकाव्यातून जीवन कसे जगावे हे जसे दिसते तसेच जीवन कसे जगू नये या गोष्टीचे देखील मार्गदर्शन होते. भगवत-गीता तसेच युधिष्ठीराने यक्षप्रश्नाला दिलेल्या उत्तरातून शाश्वत मानवी मूल्यांचे दर्शन घडते. विनीत अग्रवाल यांनी महाभारतातील विविध प्रसंग एका नव्या दृष्टीकोनातून लिहिले आहे. त्यांचे हिंदी तसेच इंग्रजी भाषेतील काव्य भाषा सौंदर्यामुळे अतिशय प्रभावी झाले आहे, असे मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केले.

जावेद अख्तर : महाभारत केवळ अठरा दिवस चाललेल्या युद्धाची गाथा नाही. महाभारत मानवी संबंधांच्या प्रत्येक पैलूंचा, भावनांचा, विचारांचा तसेच जीवन मूल्यांच्या विविध रंगांचा महासागर असून आजही त्या सागरातून विचारांचे नवनवे मोती गवसतात. विनीत अग्रवाल यांनी या सागरातून काव्य रूपाने नवे मोती शोधले आहेत. त्यांनी ज्या दृष्टीकोनातून महाभारताची युद्धभूमी पाहिली त्या दृष्टीकोनातून आजवर कुणीही पाहिली नाही, असे मत प्रसिद्ध पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी यावेळी व्यक्त केले.

वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक फणसाळकर, प्रधान सचिव वंदना कृष्णा, अभिनेते स्वप्नील जोशी तसेच विनीत अग्रवाल यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा