महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीच्या प्रयत्नातून विकासाचे पर्व- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, १६ मे, २०१८
महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीची स्थापना; पीएमआरडीए, एमएडीसीचे सिंगापूरमधील कंपन्यांशी करार संपन्न

मुंबई -
महाराष्ट्रातील गृहनिर्माणाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांसह विविध क्षेत्रांत महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीचे प्रयत्न विकासाचे पर्व निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. महाराष्ट्र -सिंगापूर संयुक्त समितीची स्थापना व कार्यकक्षा निश्चितीबाबतच्या महत्त्वपूर्ण मसुद्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस तसेच सिंगापूरचे उद्योग व व्यापारमंत्री एस. ईश्वरन यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) यांच्या वतीने सिंगापूरमधील कंपन्यांशी करार करण्यात आले. त्यानुसार पीएमआरडीए क्षेत्रात वर्ल्ड क्लास मास्टर-प्लॅनिंगसाठी सुर्बाना जुरांग आणि ग्रीनफिल्ड एअरफिल्ड या पुरंदर विमानतळाच्या विकासासाठी चांगी एअरपोर्ट इंटरनॅशनल या सिंगापूरमधील कंपन्या सहकार्य करणार आहेत.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या संयुक्त समितीच्या बैठकीसाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त लीम क्वॉन, राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, नागरी विमान सेवा विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, एमएडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, सिंगापूरचे भारतातील वकिलातीचे प्रमुख अजित सिंग, सिंगापूरच्या व्यापार-उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ संचालक डॉ. फ्रान्सिस चाँग, तसेच प्रतिनिधी मंडळात समावेश असलेल्या सिंगापूरमधील विविध उद्योग व व्यापार समूहांचे प्रमूख वरिष्ठ अधिकारी टॅन सून किम, आलोक भुनिया, विनम्र श्रीवास्तव, माईक फोरमोसो, वाँग फिने आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या संयुक्त समितीची स्थापना हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सिंगापूरने छोटा देश असूनही विकासाच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. हा विकासच समितीच्या स्थापनेची प्रेरणा आहे. या समितीमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग देता येणार आहे. मुंबईप्रमाणेच राज्यातील अनेक शहरांत विकासाची मोठी क्षमता आहे. पुणे हे त्यापैकी एक शहर आहे. पुण्याचा नागरी क्षेत्रातील विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे पीएमआयरडीएच्या द्वारे या शहराच्या विकासाला आकार देण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशा योग्य वेळी संयुक्त समितीच्या प्रयत्नातून पुण्याचे सुनियोजन करता येईल. त्यातून नागरी-नियोजनाचा उत्तम नमुनाही जगासमोर ठेवता येईल. त्यामुळे पुणे विकासाचे ग्रोथ इंजिनही ठरू शकेल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गृहनिर्माण क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. देशात मुबलक जमीन आणि साधनसंपत्ती उपलब्ध आहे. त्या जोडीला तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्यात सहकार्य मिळाल्यास, मोठ्या प्रमाणात घरे बांधता येतील. सिंगापूर आणि महाराष्ट्र शासनाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता हे समान वैशिष्ट्य आहे. या पारदर्शकतेमुळेच अनेक विकास प्रकल्प यशस्वी करता येतील. त्यादृष्टीने यापुढे विकासाचे पर्व निर्माण करता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

सिंगापूरचे उद्योग व व्यापारमंत्री श्री. ईश्वरन म्हणाले, सिंगापूर आणि महाराष्ट्राच्या दरम्यानचे हे सहकार्य यापुढे अनेक विकास प्रकल्पांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरेल. दोन्ही शासनांच्या दरम्यानचे संबंध वृद्धींगतही होतीलच, पण यातून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणाऱा विकासही साधता येईल. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्रातील शासन-प्रशासनाचा विकासाचा दृष्टीकोन आणि अंमलबजावणीतील तत्परता या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे विविध औद्योगिक संधींसह, दळण-वळण आणि गृहनिर्माण क्षेत्रातही विकासाच्या मोठ्या संधी आहेत. मुंबई आणि पुण्यासारख्या दाट लोकवस्तींच्या शहरातील आव्हानात्मक प्रश्नांवर रचनात्मक उपाय योजनांसाठीही हे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल.

ही संयुक्त समिती यापुढे नागरी पायाभूत सुविधा, विमानसेवा तसेच उद्योग क्षेत्रातील विकास क्षेत्रात काम करणार आहे. त्याबाबतचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. तसेच पीएमआरडीएच्या वतीने सुर्बाना जुरांग यांच्याशी करार करण्यात आला. त्याबाबत पीएमआरडीएचे आयुक्त श्री. गित्ते यांनी मास्टर-प्लॅनबाबत सादरीकरण केले व करारावर स्वाक्षरी केली. तसेच ग्रीनफिल्ड एअरफिल्ड या पुरंदर विमानतळाच्या विकासाबाबत एमएडीसीचे उपाध्यक्ष श्री. काकाणी यांनी सादरीकरण केले व करारावर स्वाक्षरी केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा