महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मागे; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद गुरुवार, १७ मे, २०१८
मुंबई : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करण्यात यावा, यासाठी सुरू असलेले संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर मागे घेण्यात आले आहे.

गेल्या 45 दिवसापासून जिल्हा कृती समितीचे आंदोलन सुरू होते, याची मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दखल घेऊन त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत समितीने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जिल्हा निर्मितीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीकडे आलेल्या माहितीचा भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. जिल्ह्याचे विभाजन करताना वैशिष्ट्यपूर्ण स्थळे, भौगोलिक रचना व लोकसंख्या, प्रशासकीय सोयी-सुविधा यांचा विचार करून समितीच्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह कृती समितीचे सर्वपक्षीय नेते, नागरिक उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा