महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
मुंबई महानगर परिसरातील उर्वरित मेट्रो रेल्वे मार्गाची कामे पुढील वर्षापर्यंत सुरु करावीत - मुख्यमंत्री शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
मेट्रो ४ अ - वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढविण्यास मान्यता

मुंबई :
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 144 व्या बैठकीत मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा विस्तार कासारवडवली ते गायमुख पर्यंत (मेट्रो 4 अ) करण्यास मान्यता देण्यात आली. मुंबई महानगर परिसरातील सर्व मेट्रो रेल्वेच्या कामांचे कार्यारंभ आदेश 2018 पर्यंत देऊन कामे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 144 वी बैठक मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे सहआयुक्त प्रवीण दराडे, संजय देशमुख, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मुंबई शहराला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 8 हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वसई–भाईंदर खाडीवरील पुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून कामाचे आदेश देण्यात यावेत. भिवंडी परिसरातील ट्रान्सपोर्ट हब व लॉजिस्टिक पार्कचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱ्या डब्यांची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी, यासाठी उत्पादक कंपन्यांबरोबर बोलणी करण्यात यावी. तसेच मोनोरेल्वेचा नवा मार्ग सुरू झाल्यानंतर त्याचे प्रवासी भाडे हे मेट्रो रेल्वेच्या समकक्ष ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वडाळा येथील अधिसूचित क्षेत्रात मल्टिमॉडेल वाहतुकीवर आधारित विकास संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामुळे रहिवासीबरोबरच वाणिज्यिक व करमणुकीचे केंद्र बनविण्यात येणार आहे. या केंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.

यावेळी मेट्रो मार्ग 2 ब च्या मंडाले येथील डेपोच्या सुधारित किंमतीस प्रशासकीय मान्यता, बांद्रा कुर्ला संकुलातील जी ब्लॉकमधील बांधकाम सुरू आहे किंवा व्हायचे आहे अशा वाणिज्यिक भूखंडावर एकूण वाणिज्य वापराच्या क्षेत्राच्या 30 टक्केपर्यंत रहिवासी वापर करणे, मेरिटाईम बोर्डास दिलेल्या भूखंडाचा वापर शासकीय व खासगी वापरास परवानगी देणे, वडाळा येथील अधिसूचित क्षेत्राचा विकास करण्यासाठी क्षेत्रातील आणिक बेस्ट आगार व माहूल खाडी जवळील भूखंडासह सुधारित नियोजन प्रस्तावास व विकास नियंत्रण नियमावलीस तत्वतः मंजुरी, संत गाडगे महाराज चौक-वडाळा-चेंबूर मोनोरेल मार्गाच्या सुधारित प्रवास भाडेदरास मान्यता आदी विविध विषयांना यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी मान्यता दिली.

मेट्रो मार्ग 4 अ हा कासारवडवली ते गायमुख हा सुमारे 2.7 किमी यामध्ये दोन नवीन स्थानके येणार आहेत. या मार्गासाठी सुमारे 949 कोटी रुपये खर्च होणार आहे. या मार्गामुळे सन 2021 मध्ये दीड लाख प्रवासी क्षमता वाढणार असून 2031 मध्ये ही क्षमता एकूण 13.44 लाख एवढी होणार आहे. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो 4 मार्ग 32.3 किमीचा असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा