महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
युनायटेड किंगडमच्या उप उच्चायुक्तांनी घेतली विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची भेट शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८
मुंबई : युनायटेड किंगडमचे उप उच्चायुक्त पॉल कार्टर यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची विधानभवनमध्ये भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळाची कामकाज पद्धत आणि युनायटेड किंगडमच्या संसदीय कामकाज पद्धतीच्या माहितीची देवाणघेवाण केली गेली.

यावेळी माजी आमदार संजय दत्त, विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, सभापतींचे सचिव म. मु. काज, विधानमंडळाचे अवर सचिव सुनील झोरे आदी उपस्थित होते.

यापूर्वी सभापती श्री.नाईक- निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या शिष्टमंडळाने युनायटेड किंगडमला भेट दिली होती. त्यावेळी तेथील संसद सदस्यांना महाराष्ट्राला भेट देण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यास प्रतिसाद म्हणून येत्या सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तेथील संसद सदस्यांची संसदीय शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याबाबतही चर्चा यावेळी करण्यात आली. सभापती श्री.नाईक-निंबाळकर यांनी, युनायटेड किंगडमच्या शिष्टमंडळाने या दौऱ्यादरम्यान मुंबईबरोबरच पर्यटनस्थळे आणि ग्रामीण जिल्ह्यांचाही दौरा करावा जेणेकरून येथील ग्रामीण जीवनपद्धतीबाबतही शिष्टमंडळाला अभ्यास करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाराष्ट्राने राष्ट्रकुल संसदीय मंडळाची परिषद आयोजित करण्याबाबत संसदेकडे प्रस्ताव सादर केला असून त्याबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा