महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट; विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा सोमवार, १६ एप्रिल, २०१८
मुंबई : न्यू साऊथ वेल्स (ऑस्ट्रेलिया) प्रांताच्या प्रमुख श्रीमती ग्लाडीज बेरजीक्लिअन यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा केली.

श्रीमती ग्लाडीज बेरजीक्लिअन यांनी सांगितले की, न्यू साऊथ वेल्स (NSW) ने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. विशेषत: आर्थिक सेवा, ऊर्जा, खाण, शेती व्यवसाय, शहरी पायाभूत सुविधा आणि पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक आरोग्य, औषधे, खेळ, कला आणि संस्कृती या क्षेत्रात एनएसडब्ल्यूने महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे. यापुढे शाळा, दवाखाने, रस्ते आदी पायाभूत सोयीसुविधांमध्ये गुंतवणूक करायची असून महाराष्ट्राशी आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. गुंतवणुकीसाठी अनेक उद्योजकांची महाराष्ट्राला पसंती असून 50 टक्क्यांपेक्षा जास्त थेट विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. राज्यात मोठ्या शहरांच्या ठिकाणी विमानतळांना मान्यता मिळाली आहे. रेल्वे, मेट्रो यांचे जाळे तयार करणे सुरू आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचेही काम प्रगतीपथावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या प्रकल्पात काम करण्याची श्रीमती बेरजीक्लिअन यांनी इच्छा दर्शविली.

देशात जीएसटी लागू झाल्याने उद्योजकांना जीएसटीव्यतिरिक्त कोणताही कर भरावा लागणार नाही. शिवाय उद्योगांना लागणारे परवाने याबाबतही शासनाने सुलभता आणली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिली.

यावेळी राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, कौशल्य व उद्योजकता, ग्रामविकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता, भारत सरकारचे व्यापार व गुंतवणूक आयुक्त रोहित मनचंदा, ऑस्ट्रेलियाचे कौन्सिल जनरल टोनी हबर, न्यू साऊथ वेल्सचे संसदीय सचिव डॉ. जेऑफ ली, विशेष राजदूत बॅरी ओफॅरेल, चिफ ऑफ स्टाफ श्रीमती साराह कृकशांक, श्रीमती बेरजीक्लिअन यांचे सचिव टीम रिअरडन, संचालक एहसान वेसझादेह आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा