महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
पुणे येथे राज्यपालांच्या उपस्थितीत मंगळवारी स्वातंत्र्यदिनाचा 70 वा वर्धापन दिन समारंभ शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
मंत्रालय येथे मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांवरही राष्ट्रध्वज उभारण्यात येणार

मुंबई :
स्वातंत्र्य दिनाचा 70 वा वर्धापनदिन मंगळवार, दि.15 ऑगस्ट रोजी राज्यात विभागीय मुख्यालये, जिल्हा मुख्यालये, उप विभागीय मुख्यालये, तालुका मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येणार आहे. त्यास अनुसरुन पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोकण विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागातील विभागीय तसेच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल. त्याचप्रमाणे पुणे येथे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. कोकण विभागीय मुख्यालय वाशी, नवी मुंबई येथे महिला व बाल विकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर, कोल्हापूर येथे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाशिव खोत, वर्धा या मुख्यालयी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर हे ध्वजारोहण करतील. उर्वरित विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री ध्वजारोहण करतील. संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील. ध्वजारोहण करणारे मंत्री व राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी वेळेवर पोहचू शकणार नसल्यास विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करुन ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

सकाळी 9 वाजून 5 मिनीटांनी होणार ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

दि. 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांना मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी सदर दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्या पूर्वी किंवा 9.35 वा. च्या नंतर आयोजित करावा, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतींवर उभारणार राष्ट्रध्वज

दि.15 ऑगस्ट रोजी राज्यात सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतींवर (खेड्यांमध्ये सुद्धा) तसेच ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांवर (उदा.रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबर्डी) राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. राष्ट्रध्वजाला वंदन करताना जन-गण-मन हे राष्ट्रगीत वाजविण्यात यावे, असेही निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

राष्ट्रध्वज लावण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक : एफएलजी-1091/30, दिनांक 20 मार्च, 1991 व क्रमांक एफएलजी - 1091/(2)/30, दिनांक 5 डिसेंबर, 1991 आणि परिपत्रक क्रमांक : एफएलजी 1098/343/30, दिनांक 11 मार्च, 1998 अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

खासदार, आमदार, जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, दलित मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे. सामुदायिक राष्ट्रगीत गायनांचा अंतर्भाव असलेले खास कार्यक्रम शाळा व महाविद्यालयात आयोजित करण्यात यावेत.

विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती हे त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे मुंबईतील कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त, कोकण विभाग व जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. मुंबई उपनगर जिल्हा येथे जिल्हाधिकारी ध्वजारोहणाची सर्व तयारी करतील. विभागीय आयुक्त, कोंकण यांनी कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करावी, असेही निर्देश या परिपत्रकान्वये दिले आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा