महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
तंत्रज्ञानाच्या वापराने हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांचा विकास शक्य - राज्यपाल चे. विद्यासागर राव शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
पश्चिम व मध्य क्षेत्रांचे राजभाषा संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई :
जगातील अनेक भाषा संकटात असताना हिंदीची वाढ होत आहे. मातृभाषेतून देण्यात आलेले ज्ञान सुलभरित्या समजते त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाचा अवलंब करुन हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्यामुळे त्यांचा विकास होईल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले.

केंद्र शासनाच्‍या राजभाषा संचालनालयामार्फत राष्ट्रीय केमीकल्स आणि फर्टिलायझर्स (आरसीएफ) कॉलनी येथे आयोजित पश्चिम व मध्य क्षेत्रांचे राजभाषा संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी राजभाषा विभागाचे सचिव प्रभास कुमार झा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

हिंदी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती किंवा सांस्कृतिक वारसा आहे, असे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले, प्रादेशिक भाषांना जोडून ठेवणारा धागा आहे. देशातील एकता, एकात्मता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी हिंदीचे योगदान सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या ऐतिहासिक भूदान आंदोलनाच्या यशस्वीतेचे श्रेय हिंदीला दिले. महात्मा गांधींनी देशाच्या एकात्मतेसाठी राजभाषेचा आग्रह धरला. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान प्रमुख नेत्यांनी स्वराज्य आणि स्वदेशीचा पुरस्कार केला. त्यामुळे हिंदी बोलण्याचा संकोच बाळगता कामा नये.

ते पुढे म्हणाले, विविध भागात प्रादेशिक भाषा बोलल्या जात असताना इंग्रजीतील ज्ञान त्या - त्या भाषेतही उपलब्ध करुन दिले पाहिजे. आज न्यायालयांमध्ये प्रादेशिक भाषांचा आग्रह धरला जातो. कनिष्ठ न्यायालयामार्फत देण्यात येणारे निर्णय प्रादेशिक भाषेत तर वरिष्ठ न्यायालयांमध्ये इंग्रजीच्या वापरामुळे दिल्या जाणाऱ्या निकालाबाबत सामान्य माणसांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयांनीही राजभाषेत व प्रादेशिक भाषेत निकाल देण्याची गरज आहे, असे करणाऱ्या न्यायाधिशांना पुरस्कार देण्याचा विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून झाल्यास विषयांचे आकलन सुलभरित्या होते हे संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संघटनेने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मातृभाषा चांगल्या प्रकारे येत असल्यास इतर भाषा शिकणे सोपे जाते. यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांनी आपल्या भाषेविषयी न्यूनगंड बाळगू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

आज चीन, कोरिया सारख्या देशांना जुन्या उत्कृष्ट मराठी चित्रपटांच्या पटकथांविषयी कुतूहल असताना सांस्कृतिक कार्य विभागानेही यात मागे न राहता हिंदीमध्ये रुपांतरण करण्याचे काम करावे, असेही ते म्हणाले.

प्रभास कुमार झा म्हणाले की, राजभाषा विभागाने देशातील १४ भाषातून सोप्या पद्धतीने हिंदी शिकण्यासाठी ‘लीला’ मोबाईल ॲप सुरू केले आहे. यामध्ये संस्कृती व साहित्याच्या विषयाचाही समावेश करण्यात येणार आहे. जनतेला त्यांच्या भाषेत सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी राजभाषा विभाग प्रयत्नशील आहे. बँकिंग डाटाबेसचे डिजिटायझेशन करण्याचे काम सुरु असून त्याद्वारे सर्व बँकिंग सेवा तेथील प्रादेशिक भाषेत मिळू शकतील. हिंदीच्या वाढीसाठी ‘हिंदी तंत्रज्ञान संशोधन केंद्र’ स्थापन करण्यात आले असून लवकरच हिंदी बहुभाषिक सॉफ्टवेअर इंटरनेटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ‘अनुवाद’ हे सॉफ्टवेअर इतर भाषातील मजकुराचे भाषांतर करण्यासाठी तयार करण्यात येत असून ते देशातील सर्व केंद्र शासनाच्या संस्थांना मोफत उपलब्ध करुन दिले जाईल. तंत्रज्ञानाचा अवलंब राजभाषा व प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी करण्यासाठी करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात मध्य व पश्चिम विभागातील शासकीय मध्य विभाग आणि पश्चिम विभागातील केंद्र शासनाचे विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीयकृत बँक, सार्वजनिक विमा कंपन्या आदींना त्यांच्या कामकाजात उत्कृष्टपणे हिंदीचा अवलंब केल्याबद्दल 2017 साठीचे ‘राजभाषा पुरस्कार’ राज्यपालांच्या हस्ते देण्यात आले. राजभाषा विभागाच्या ‘राजभाषा भारती’ या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

राजभाषा विभागाचे सहसचिव डॉ. बिपीन बिहारी यांनी स्वागत केले. भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार, आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उमेश धात्रक, गुजरातच्या मुख्य आयकर आयुक्त आशा अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. इस्पात, भिलाईचे महाव्यवस्थापक अनिरुद्ध गुहा, राजभाषा विभागाचे संदीप आर्य आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा