महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची सोय शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९

मुंबई शहर कौशल्य केंद्र कार्यालयाचा पुढाकार

मुंबई : मुंबई शहर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची सोय करण्यात आली आहे. https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर मुंबई जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केल्यास त्यांना या ग्रंथालयामध्ये बसून अभ्यास करता येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, सैन्य भरती इत्यादी आस्थापनांच्या स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असणारी 600 पेक्षा अधिक पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. अंकगणित, सामान्यज्ञान, इंग्रजी व्याकरण, इतिहास,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी विविध विषयांवरील पुस्तके येथे उपलब्ध असून किमान 15 विद्यार्थ्यांची बसण्याची सोय आहे. विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वाने ग्रंथालयाचा वापर विनाशुल्क करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर, श्रेयस चेंबर्स, 1 ला माळा 175, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - 400001 येथे संपर्क साधावा.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता सेवायोजन नाव नोंदणीच्या ओळखपत्रासह कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते 4.30 पर्यंत (दुसरा व चौथा शनिवार, सर्व रविवार व इतर सार्वजनिक सुट्ट्या वगळून) या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहराच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक संचालक सी. ए. कुबल यांनी केले आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा