महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
गंगनम जिल्ह्याच्या महापौर येवोन सिन यांनी घेतली राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांची सदिच्छा भेट गुरुवार, १२ ऑक्टोंबर, २०१७
मुंबई : दक्षिण कोरियातील सेऊल प्रांतातील गंगनम जिल्ह्याच्या महापौर येवोन ही सिन यांनी राज्याचे नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांची भेट घेऊन मेट्रो, शहरांमधील पायाभूत सुविधा प्रकल्प आदींबाबत चर्चा केली.

श्रीमती सिन यांनी तेथील नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह डॉ.पाटील यांची मंत्रालयातील दालनात सदिच्छा भेट घेतली.

यावेळी डॉ.पाटील यांनी मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो ३ प्रकल्प व त्यासाठी वापरण्यात येत असलेले आधुनिक तंत्रज्ञान तसेच इतर पायाभूत सुविधांची सविस्तर माहिती दिली. मुंबई सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी वाहतूक सुविधा निर्माण करण्यासाठी घेतलेले मेट्रो, मोनोरेल्वे प्रकल्प, प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प आदींची माहिती दिली. तसेच मेट्रो ३ च्या भुयारी रेल्वे मार्गाचे काम कशाप्रकारे सुरू आहे. त्यासाठी राज्य शासनाने घेतलेले निर्णयही त्यांना सांगितले.

यावेळी दोन्ही नेत्यांनी शहरांच्या एकात्मिक विकासासाठी कोण कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, याबद्दलच्या विचारांची आदानप्रदान केली. यावेळी श्रीमती सिन यांनी गंगनम शहरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा, वाहतूक प्रकल्प, डिजिटल प्रशासन, वैद्यकीय पर्यटन आदी विविध प्रकल्पांची माहिती दिली. तसेच गंगनम जिल्ह्यात सुरू होत असलेल्या भुयारी वाहतूक मार्गाच्या मोठ्या प्रकल्पाची माहिती यावेळी दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा