महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी - राज्यपाल चे. विद्यासागर राव बुधवार, ०६ डिसेंबर, २०१७
मुंबई : जगभर पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. तसेच राज्य शासनामार्फतही येत्या सहा महिन्यात प्लॅस्टिकवर बंदी आणण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एसआयईएस हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या पृथ्वी प्रदर्शनाचे उद्घाटन मा. राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. यावेळी एसआयईएसचे अध्यक्ष व्ही.शंकर, उपाध्यक्ष पी. सेतुरामन, सचिव एस.गणेश यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्याणी आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, आज वातावरणात बदल होत आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. नवीन पिढी पर्यावरण विषयक बाबींमध्ये अत्यंत जागरुक असून नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी पुढे येत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. नैसर्गिक स्त्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मुलांनी पुढे येणे आवश्यक असून याची सुरुवात शाळेपासून होत आहे ही आनंदाची बाब आहे.

सध्याच्या परिस्थितीत नवी दिल्ली येथे हवेतील प्रदूषण ही आपल्यासाठी अत्यंत खेदजनक बाब आहे. पर्यावरणात होत असलेले बदल यामुळे अपुरा आणि अवेळी पाऊस होतो आणि मग अनेकदा पूरस्थिती किंवा मग दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते हे सगळे टाळणे आपल्या हाती असून यासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. विकास आणि नैसर्गिक स्त्रोतांचा वापर यांचे संतुलन राखणे आवश्यक आहे.

साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत पृथ्वी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राज्यातील जवळपास 300 शाळांनी सहभाग घेतला आहे. आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून येणाऱ्या काळात पृथ्वीचा होणारा ऱ्हास रोखणे, पर्यावरणाचे संतुलन राखणे कसे आवश्यक आहे ते या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. यापूर्वीही एसआयईएसमार्फत पाणी आणि वने याविषयावर प्रदर्शन मांडण्यात आले होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा