महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
मी मुख्यमंत्री बोलतोय : कर्जमाफीविषयक दुसऱ्या भागाचे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन रविवारी प्रसारण शनिवार, १५ जुलै, २०१७
मुंबई, : शेतकरी कर्जमाफी संदर्भातील ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचे उद्या रविवारी १६ जुलै २०१७ रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन प्रसारण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कर्जमाफीसंदर्भातील विविध प्रश्नांना या कार्यक्रमात उत्तरे दिली आहेत.

जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. यात ‘शेतकरी कर्जमाफी’ या विषयावरील पहिल्या भागाचे रविवार दिनांक ९ जुलै २०१७ रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन प्रसारण झालेले आहे. याच विषयावरील दुसऱ्या भागाचे प्रसारण उद्या रविवार दि. १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबई दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनी, झी २४ तास आणि साम टीव्ही या वाहिन्यांवरुन होणार आहे. तसेच झी मराठी वाहिनीवर सकाळी १०.३० वाजता त्याचे प्रसारण होईल.

आकाशवाणीवरुनही होणार प्रसारण

या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवार दिनांक १७ जुलै २०१७ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन सायंकाळी ५.३० वाजता होईल. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण सोमवार दि. १७ जुलै आणि मंगळवार दि. १८ जुलै रोजी सकाळी ७.२५ वाजता होईल.

या कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्यभरातील लोकांनी विचारलेल्या तसेच कार्यक्रमाच्या चित्रीकरणावेळी उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाआधी ई-मेल आणि एसएमएसवरुन लोकांकडून या विषयावर प्रश्न मागविण्यात आले होते. त्याला राज्याच्या विविध भागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण २० हजाराहून अधिक जणांनी यात सहभाग घेऊन शेतकरी कर्जमाफी, कर्ज पुनर्गठन, शेतमालाला हमीभाव, नवीन पीक कर्ज अशा विविध मुद्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले होते. यातील निवडक प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात उत्तरे दिली आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा