महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेतील विजयी पैलवानांना अद्ययावत प्रशिक्षणाची सुविधा देणार -क्रिडामंत्री विनोद तावडे रविवार, १५ एप्रिल, २०१८
मुंबई - स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेतील प्रत्येक गटातील दोन-दोन विजयी पैलवान खेळांडूची निवड करुन अनिवासी क्रिडा प्रबोधिनीमध्ये त्यांना अद्ययावत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देऊ. तसेच आवश्यकता असेल त्या पैलवान खेळाडूंना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मकरित्या सहकार्य करेल असे ठाम प्रतिपादन क्रिडामंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले.

राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषद तसेच मुंबई उपनगर जिल्हा पूर्व व पश्चिम तालीम संघ आणि विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समिती यांच्या वतीने मुंबई उपनगरात प्रथमच चौथी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धाचा (पुरुष व महिला) आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या कुस्ती स्पर्धेचा समारोप आज झाला. क्रिडामंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा अंतिम पारितोषिक सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, आमदार मंगेश कुडाळकर, पैलवान नरसिंह यादव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रणजीत खाशाबा जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राला गौरव वाटेल अशी ही कुस्ती स्पर्धा आहे. यंदाच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्य सरकारच्या वतीने उत्तमरित्या करण्यात आले, त्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू व पंच यांना चांगल्या सुविधा प्राप्त झाल्या असेही श्री.तावडे यांनी सांगितले. या स्पर्धेतील पैलवानांनी येथे उत्तम कामगिरी केली असून भविष्यात हेच पैलवान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच देशाला अभिमानास्पद कामगिरी करतील असा विश्वासही श्री. तावडे यांनी व्यक्त केला.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष महिला) २०१७-१८ च्या स्पर्धांमध्ये फ्री स्टाईल गट, ग्रीको रोमन गट, तर फ्री स्टाईल गट यामध्ये ३६० खेळाडू सहभागी झाले होते.या स्पर्धेमध्ये ३० सुवर्ण, ३० रौप्य व ६० कांस्य पदके वितरण करण्यात आली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा