महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
तलाठ्यांच्या मागण्यावर राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करणार - चंद्रकांत पाटील सोमवार, १६ एप्रिल, २०१८
तलाठ्यांचा डिजिटल सिग्नेचरच्या कामावरील बहिष्कार मागे

मुंबई :
तलाठ्यांच्या सर्वसाधारण बदल्या, रिक्त पदांची भरती, ऑनलाईन सातबारा कामासंदर्भात दिलेल्या नोटिसा मागे घेणे आदी तलाठी संघटनेच्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांना दिले. या चर्चेनंतर तलाठी संघटनेने सात बारामधील डिजिटल सिग्नेचरच्या कामकाजावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे जाहीर करण्यात आले.

राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात संघटनेच्या प्रतिनिधींची आज महसूलमंत्री श्री. पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऑनलाईन सातबारा प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप, तलाठी संघटनेचे अध्यक्ष एस.एम. जोशी, महासंघाचे सरचिटणीस बाळकृष्ण गाढवे, विदर्भ पटवारी संघटनेचे संजय अनव्हाने, एम. बी. सावंत, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले की, राज्यातील सर्व सात बारा उतारे ऑनलाईन करण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्प हाती घेतला आहे. हे काम करण्यासाठी राज्य शासनामार्फत तलाठ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले होते. काही ठिकाणी लॅपटॉप अद्याप दिले नाही, अशा ठिकाणी लवकरच अद्ययावत लॅपटॉप देण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच तलाठ्यांच्या सर्वसाधारण बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. आता ३१ मे पर्यंत या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. डिजिटल सातबारा प्रकल्प राबविताना तलाठ्यांवर केलेली कार्यवाही मागे घेण्यासंबंधी सकारात्मक विचार करण्यात येईल.

महसूल मंत्र्यांनी केले तलाठ्यांचे अभिनंदन

राज्यातील ऑनलाईन सात बारा प्रकल्प राबविताना तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आदींनी अहोरात्र मेहनत केली. त्यामुळे राज्यातील सर्वच गावातील सातबारा उतारे डिजिटल झाले आहेत. याकामाची दखल घेऊन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज तलाठ्यांचे अभिनंदन केले. श्री. पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षात महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीदार व जिल्ह्यातील यंत्रणेने केलेल्या कामामुळेच डिजिटल सात बाराचे एवढे मोठे काम पूर्ण होत आहे. देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात असे काम होत असल्याचाा मला अभिमान वाटत आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा