महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात- पणनमंत्री सुभाष देशमुख गुरुवार, १७ मे, २०१८
मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील महत्त्वाची बाजारपेठ असून येथील बाजार समितीच्या आवारात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले.

व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत आज पणनमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी आमदार शरद सोनावणे, बाजार समितीच्या पाचही बाजार आवारातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, मुंबई बाजार समिती ही राष्ट्रीय बाजार आवार म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येथे व्यापाऱ्यांनाही चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा असाव्यात याविषयी चर्चा करण्यात आली. फळे-भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी जागा अपुरी असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. अशा अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन व बाजार समितीतील घटकांनी संवाद ठेवून नियमित बैठका घ्याव्यात, अशी सूचना श्री. देशमुख यांनी यावेळी केली.

बाजार समितीच्या आवाराच्या बांधकामाच्या पुनर्विकासाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. बाजार अावाराच्या पुनर्बांधणीबाबत तज्ज्ञ वास्तुविशारदाची नेमणूक प्रशासकांनी करावी, असेही पणनमंत्र्यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा