महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार - राज्यमंत्री विजय देशमुख गुरुवार, ०७ डिसेंबर, २०१७
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, पद पुनरुज्जीवन व इतर समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील.त्या संदर्भात सर्व जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाचा आढावा घेतला जाईल, असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आज सांगितले.

भारतीय जनता कामगार महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात श्री.देशमुख यांची आज भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत भारतीय जनता कामगार महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदने श्री.देशमुख यांना दिली. यावेळी श्री.देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेतील आरोग्य सहाय्यकांना लवकरच त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. याबरोबरच रिक्त पदे भरण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतले जाईल.त्यासाठी जिल्हा परिषदांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मागविण्यात आला असून रिक्त पदे भरल्यानंतर त्यांचे वेतन नियमित होण्यासाठी तरतूद केली जाईल. आरोग्य पर्यवेक्षकांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येतील.

राज्यभरात ६ हजारांवर बंधपत्रिका कंत्राटी आरोग्य सेविका आहेत. नव्याने परीक्षा घेऊन पदे भरण्यापेक्षा या आरोग्य सेविकांची एकत्रित सेवा ज्येष्ठता यादी तयार करून निवड समिती नेमून पदे भरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. याबरोबरच राज्य जिल्हा पातळीवर आदर्श आरोग्य कर्मचारी दिले जातील. राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आरोग्य सहाय्यक या पदाची ६ व्या वेतन आयोगामध्ये प्रलंबित राहिलेली वेतनत्रुटी दुरुस्त करण्याबाबत प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी श्री.देशमुख यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी आरोग्य विभागाचे (हिवताप) सहसंचालक एम.एस.डिग्गीकर, ग्राम विकास विभागाचे उपसचिव गिरीश भालेराव, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर, भारतीय जनता कामगार महासंघाचे अध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा