महान्यूज
जलसंधारणासाठी काकरदरा ठरले मॉडेल बुधवार, १२ जुलै, २०१७
सत्यमेव जयतेच्या वॉटरकपमध्ये घेतली आघाडी
22 गावांमध्येही जलसंधारणाचा आदर्श पॅटर्न
पहिल्याच पावसात काकरदरा झाले जलयुक्त

पाणी टंचाईचा सातत्याने सामना करताना आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी सत्यमेव जयतेच्या वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभागी होऊन संपूर्ण गाव जलयुक्त करण्याचा अभिनव उपक्रम वर्धा जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा संपूर्ण आदिवासी बहूल काकरदरा या गावाने यशस्वीपणे राबविला आहे. यासोबतच आर्वी तालुक्यातील 22 गावांनीही वॉटरकप स्पर्धेत उतरुन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. जलदेवतेचे गाव म्हणून काकरदरा हे गाव संपूर्ण राज्यात ओळखले जात आहे.


सत्यमेव जयतेच्या वॉटरकप स्पर्धा जाहीर झाल्यानंतर नागपूर विभागात केवळ आर्वी तालुक्याने पुढाकार घेऊन काकरदरासह 22 गावांनी स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्धार केला होता. यासाठी आर्वीचे सुमित वानखेडे तसेच त्यांच्या युवा सहकार्यांनी केलेल्या दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर 22 गावात जलसंधारणाची विविध कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. यासाठी गावातील सरपंच व ग्रामस्थांचा सहभाग मिळाल्यामुळे लोकसहभागातून करावयाच्या विविध कामांना चांगला प्रतिसाद मिळाला. या संपूर्ण उपक्रमाची प्रेरणा ठरली ते गाव म्हणजे काकरदरा. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून ग्रामस्थांनी श्रमदानाने उभ्या केलेल्या जलसंधारणाच्या उपचारामुळे पहिल्याच पावसात हे गाव पाणीदार ठरले आहे. ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिस्थापना हे या गावचे वैशिष्‍ट्य ठरले आहे. वॉटरकप स्पर्धेच्या अंतिम निवडीमध्ये आपले गाव निश्चितच आघाडीवर राहील हा आत्मविश्वास येथील ग्रामस्थांना आहे.

काकरदरा या गावच्या जलसंधारणाच्या विविध उपक्रमामुळे या गावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होणार आहे. यामध्ये सलग समतलचर (सीसीटी) बांधकामामुळे 75.84 घनमीटर, कंटुर बांधकामामुळे 2 हजार 938.64 घनमीटर तसेच अनघड दगडी बांधामुळे 919.06 घनमीटर कामामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होणार आहे. ही संपूर्ण कामे ग्रामस्थांनी सकाळी 6 ते रात्री उशिरापर्यंत श्रमदानाने पूर्ण केली आहेत. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत आहे. श्रमदानाबरोबरच लोकसहभागातून मशीनद्वारे खोल, समतल, पातळीचर, शेतीबांध बंदिस्ती, कंपार्टमेंट बंडींग, कंटुर बंध, शेततळे, लहान माती बंधारा, माती नाला बांध, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची सरासरी 56 हजार 665.89 घनमीटरची कामे पूर्ण झाली आहेत.

जलयुक्त शिवारासोबतच गाव स्वच्छ व पर्यावरणयुक्त रहावे यासाठी प्रत्येक घरातून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 70 शोष खड्डे खोदण्यात आले. तसेच विहीर पुनर्भरण व रचनांची दुरुस्तीची तीन कामे पूर्ण करतानाच गावात वृक्षारोपण करण्यासाठी चारशे खड्डे खोदून तेथे वृक्षारोपणही करण्यात आले. या काकरदरासोबतच पिंपळगाव (भोसले), नेरी (मिर्झापूर), बोथली (नटाळा) या गावानेही काकरदराचा आदर्श पुढे नेऊन नाला खोलीकरण, रुंदीकरण, शेततळे, कंपार्टमेंट बंडींग, लहान माती बंधारा, दगडी बांध अशी प्रत्येक गावात सरासरी 60 हजार ते 65 हजार घनमीटरची कामे पूर्ण केली आहेत. त्यासोबत गावात शोष खड्डे व प्रत्येक गावात वृक्षारोपणासाठी सरासरी चारशे ते पाचशे खड्डे खोदून वृक्षारोपणाला सुरुवात केली आहे.

62 हजार 599 घ.मी. जलसाठा

पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्णतेकडे जातांना आदिवासी बहूल असलेल्या काकरदरा या गावाने लोकसहभागातून तसेच स्वपरिश्रमातून गावात 62 हजार 599.07 घनमीटर जलसाठा निर्माण होईल ऐवढी कामे केली आहेत. या कामाची दखल सत्यमेव जयतेच्या वॉटरकपच्या चमुने सुद्धा घेतली आहे. या गावासोबतच पिंपळगाव (भोसले) येथे 56 हजार 584.92 घनमीटर, नेरी (मिर्झापूर) एकूण 70 हजार 964.16 घनमीटर तर बोथली (नटाळा) या गावातही राबविलेल्या विविध उपचारामुळे 75 हजार 621.98 घनमीटर जलसाठा निर्माण होणार आहे. पहिल्याच पावसात या गावांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमात जलसाठा निर्माण झाल्यामुळे गावकरी आनंदीत झाले आहेत.

या गावाचा आदर्श घेत तालुक्यातील सावंगी (पोड), पिंपळखुटा, माडेगाव (टेका), बोथली (किन्हाळगाव), सावद, विरुळ, रसुलाबाद, दिघी, रोहणा, बेढोणा, बेल्लारा, वाढोणा, दहेगाव (मुस्तफा), तळेगाव (रघुजी), पानवाडी, बोरगाव (हातला), उमरी (सुकडी) या गावातही जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी श्रमदान करुन कामे पूर्ण केली आहेत. सत्यमेव जयतेच्या वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने ‘जल है तो कल है’ हा एकच ध्यास घेऊन पाण्यासाठी पुढच्या पिढीला त्रास होऊ नये यासाठी जलयुक्त शिवारसाठी हजारो हात एकत्र आले आहेत. उद्देश केवळ आपले गाव जलयुक्त आणि केवळ जलयुक्त करण्याचा.

- अनिल गडेकर
जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर
9890157788
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा