महान्यूज
जिल्ह्यातील 454 गावे झाली जलयुक्त सोमवार, २१ मे, २०१८
सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात गेल्या चार वर्षात झालेल्या कामांचे दृष्य परिणाम राज्यात सर्वत्र दिसायला लागले आहेत. जिल्ह्यातही या अभियानांतर्गत आतापर्यंत एकूण 893 गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या व होत असलेल्या कामांमुळे या गावामधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 454 गावे प्रकल्प आराखड्यानुसार जलयुक्त झाली आहे.

जलयुक्त शिवार अभियानामुळे या गावांची केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंदही तयार झाला असून हजारो हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. याचा लाभ असंख्य शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळेच जलयुक्त शिवार हे अभियान शेती व शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.

टंचाईसदृश्य परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्याबरोबरच राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 चे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्यात डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पाच वर्षांत राज्यातील 25 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा शासनाचा मानस आहे.

कृषि विभाग, लघुसिंचन, जिल्हा परिषद, लघुसिंचन, जलसंधारण, वन विभाग, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभाग, उप मुख्य कार्यकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद, जळगाव आदी विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे करण्यात येत आहे. या सर्व विभागांच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी वाटचाल पहायला मिळत आहे.

जिल्ह्यात या अभियानात सन 2015-16 मध्ये 232 गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये विविध यंत्रणांमार्फत 7316 कामे पूर्ण करण्यात आली. दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात झालेल्या कामांमुळे समाविष्ट करण्यात आलेली 232 गावे शंभर टक्के जलयुक्त (वॉटर न्युट्रल) झाली आहे. या कामांमुळे जिल्ह्यात या वर्षात 36118 टी.सी.एम. साठवण क्षमता निर्माण झाली असून 58667 हेक्टर क्षेत्राला एक पाण्याची पाळी तर 29333 हेक्टर क्षेत्राला दोन पाण्याची पाळी देता येईल इतके संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे एका पाण्यामुळे वाया जाणारे पिकांना जलयुक्त शिवार अभियान संजीवनी देणारे ठरले आहे.

सन 2016-17 मध्ये या अभियानात 222 गावांची निवड करण्यात आली होती. या गावात 4856 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी 4846 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर 11 कामे प्रगतीपथावर आहे. या कामांवर आतापर्यंत 124 कोटी 76 लाख 23 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. या वर्षात झालेल्या कामांमुळे निवड झालेली सर्व 222 गावे शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत.

सन 2017-18 मध्ये जिल्ह्यातील 206 गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांमार्फत 4271 कामे प्रस्तावित केली आहेत. यापैकी 1207 कामे पूर्ण तर 2394 कामे प्रगतीपथावर असून या कामांवर आतापर्यंत 5 कोटी 38 लाख 64 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. जलयुक्त शिवारमध्ये शेततळे, सिमेंट नालाबांध, नाला खोलीकरण यासह अन्य महत्त्वाची कामे करण्यात आली आहेत तर काही कामे सुरु आहेत. या अभियानात सुरु असलेली कामे येत्या पावसाळ्यापूवी पूर्ण व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे सतत यंत्रणेच्या बैठका घेऊन कामांचा घेत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिक काम व्हावे यासाठी यावर्षी 2018-19 मध्ये जिल्ह्यातील 233 गावांची निवड करण्यात आली.

या अभियानात आतापर्यंत जिल्ह्यातील 1504 गावांपैकी 893 गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जामनेर तालुक्यातील सर्वाधिक 134 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अमळनेर तालुक्यातील 101 गावे, चाळीसगाव तालुक्यातील 88 गावे, तर पारोळी व पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी 73 गावांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे निवड झालेल्या गावांमध्ये संरक्षित सिंचन निर्माण होत असून येणाऱ्या काळात जिल्ह्यात या अभियानामुळे शेतीला हक्काचे सिंचन मिळणार आहे.

राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी प्रयत्नशील असून यासाठी शेतीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. या गुंतवणूकीच्या माध्यमातून शेतकऱ्याला निश्चित उत्पन्नाची साधने निर्माण व्हावीत यावर शासनाचा भर आहे.

-विलास बोडके
जिल्हा माहिती अधिकारी
जळगाव
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा