महान्यूज
जलयुक्त शिवार अभियानातून ८७ हजार टीसीएम पाणीसाठा शुक्रवार, ०८ जून, २०१८
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून गेल्या तीन वर्षांत सांगली जिल्ह्यातील 421 गावांमध्ये 17 हजार 336 कामे पूर्ण झाली आहेत. या गावांमध्ये 87 हजार 496 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण होऊन 45 हजार 248 हे. क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. तसेच लोकसहभाग/ शासकीय यंत्रणाद्वारे जवळपास 72 लाख घनमीटर गाळ काढून त्यामधून 7191 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला आहे. चालू सन 2018-19 आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील 8 तालुक्यांतील 103 गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात सांगली जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीचा घेतलेला हा आढावा.

दि. 5 डिसेबर 2014 च्या शासन निर्णयान्वये जलयुक्त शिवार अभियान योजना राबविण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान 2015-16 अंतर्गत 141 गावे निवडण्यात आली. या गावांमध्ये एकूण प्रस्तावित 4 हजार 729 कामांपैकी सर्व 4 हजार 729 कामे पूर्ण झाली आहेत. त्या कामांवर 100 कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यातून अंदाजे 50 हजार 152 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला असून त्याद्वारे 25 हजार 76 हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येईल.

सन 2016-17 मध्ये 140 गावे निवडण्यात आली. या गावांमध्ये एकूण प्रस्तावित 4 हजार 773 कामांपैकी सर्व 4 हजार 773 कामे पूर्ण झाली आहेत. त्या कामांवर सर्व निधी स्त्रोताद्वारे 99 कोटी रुपये खर्च झालेला आहे. त्यातून अंदाजे 28 हजार 583 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण होणार असून त्या द्वारे 14292 हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येईल.

या अभियानांतर्गत सन 2017-18 मध्ये 140 गावे निवडण्यात आली. या गावांमध्ये एकूण प्रस्तावित 7 हजार 951 कामांपैकी 7 हजार 927 कामे सुरु करून, त्यापैकी 7 हजार 834 कामे पूर्ण झाली आहेत. 93 कामे प्रगतीपथावर आहेत. त्या कामांवर सर्व निधी स्त्रोतांद्वारे 12 कोटी 32 लाख रुपये खर्च झालेला आहे. त्यातून अंदाजे 11761 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण होणार असून त्याद्वारे 5 हजार 880 हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येईल.

या अभियानाला मिळालेले लोकसहभागाचे पाठबळ उल्लेखनीय आहे. लोकसहभागातून/ शासकीय यंत्रणाद्वारे 2015-16 मध्ये एकूण 121 गावामधील सिमेंट बंधारे, केटीवेअर, पाणी साठवण तलाव, पाझर तलाव इत्यादी विविध 871 कामांतून 27.19 लाख घनमीटर गाळ काढलेला आहे. या कामाची अंदाजे किंमत 11.34 कोटी रुपये इतकी आहे. त्यातून अंदाजे 2719 टीसीएम पाणीसाठा निर्माण झालेला असून 1360 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झालेले आहे.

लोकसहभागातून/ शासकीय यंत्रणाद्वारे सन 2016-17 मध्ये 130 गावामधील सिमेंट बंधारे, केटीवेअर, पाणी साठवण तलाव, पाझर तलाव इत्यादी विविध 1276 कामांमधून 41.41 लाख घनमीटर गाळ काढलेला आहे. कामाची अंदाजे किंमत 12.80 कोटी रुपये इतकी आहे. त्यातून 4141 टीसीएम पाणीसाठा निर्माण झालेला असून 2071.00 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झालेले आहे.

लोकसहभागातून/ शासकीय यंत्रणाद्वारे सन 2017-18 मध्ये 135 गावातील सिमेंट बंधारे, केटीवेअर, पाणी साठवण तलाव, पाझर तलाव इत्यादी विविध 280 कामांमधून 3.31 लाख घनमीटर गाळ काढलेला आहे. कामाची अंदाजे किंमत 1.53 कोटी रुपये इतकी आहे. त्यातून 331 टीसीएम पाणीसाठा निर्माण झालेला असून 166 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झालेले आहे.

चालू सन 2018-19 आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 103 गावांमध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये गावस्तरावरील प्रशिक्षण पूर्ण झाले असून, आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. चालू वर्षी 199 कामे सुरू करण्यात आली असून, त्यापैकी 135 कामे पूर्णही झाली आहेत. 64 कामे प्रगतीपथावर आहेत.

एकंदरीत जलयुक्त शिवार अभियानातून जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब शिवारातच अडवून तो जमिनीत मुरविण्याच्या कामास प्रशासकीय यंत्रणा आणि गावकऱ्यांनी दिलेले प्राधान्य सर्वार्थाने महत्वाचे ठरले आहे. या अभियानामुळे चांगला पाऊस पडल्यानंतर भविष्यात कधीच दुष्काळ पडणार नाही, ही आशा!

-संप्रदा द. बीडकर
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा