महान्यूज
पंचतीर्थे : वारसा अभिमानाचा बुधवार, १३ एप्रिल, २०१६
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवार्थ अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. बाबासाहेबांच्या जीवनाशी अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा आणि स्थळांचा संबंध आहे, या घटना, ही स्थळे अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. यापैकी काही स्थळांचा विकास करण्याचे केंद्र व राज्य सरकारने ठरवले आहे. त्या स्थळांना पंचतीर्थेम्हणून संबोधण्यात येणार आहे.


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञावंताची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती देशभर साजरी होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबडेकर हे सर्वांसाठीच एक प्रेरणास्रोत, ऊर्जास्रोत असल्यानं दिवसेंदिवस त्यांच्या अनुयायांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यांची जयंती केवळ भारतापुरतीच मर्यादित न राहता अनेक देशांत या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रज्ञेचा सागर, ज्ञानाचा महासूर्य, समतेचा पुरस्कर्ता आणि दीन-दलितांचा उद्धारकर्ता अशी कितीतरी विशेषणे लावली तरी त्यांच्या कीर्तीपुढे फिकी पडतील. एवढी महानता डॉ.आंबेडकरांची होती. त्यांनी आपले संबंध आयुष्य विद्येसाठी खर्ची केल्याने कोलंबिया विद्यापीठाने त्यांचा पुतळा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारामध्ये बसवला. त्यांनी जिथे जिथे प्रवेश केला, त्यांचा जिथे जिथे स्पर्श झाला. त्या सर्व वास्तू पावन झाल्या आहेत.

महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबडेकरांची अनेक स्मरणस्थळे आहेत. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंगाच्या काही वास्तू साक्षीदार आहेत. त्यात त्यांचे जन्मगाव आंबडवे, ता.मंडणगड जि.रत्नागिरी, त्यांनी जिथं बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ती नागपूरची दीक्षाभूमी, माणगाव ता.कोल्हापूर येथे घेतलेली माणगाव परिषद, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, येवला, जि. नाशिक येथे केलेली धर्मातरांची घोषणा, नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश, सातारा शाळेतील पहिलीचा प्रवेश, त्यांनी सुरू केलेले औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय, मुंबई येथील त्यांचे निवासस्थान राजगृह, पुण्यातील तळेगाव येथील त्यांचा बंगला, देहूरोड येथे स्थापन केलेली बुद्धमूर्ती. अशा कितीतरी स्थळांचा उल्लेख करता येईल. या स्थळांना अनेक जण आज श्रद्धेने भेट देऊन डॉ.आंबडकरांच्या स्मृती जाग्या करतात, त्यातून प्रेरणा घेऊन तिथे नतमस्तक होतात.

महाराष्ट्रातील या महत्त्वपूर्ण स्थळांव्यतिरिक्त आणखी काही विदेशातील स्थळेही डॉ.आंबेडकरांच्या सहवासाने पुनीत झाली आहेत, त्यामध्ये लंडन येथे शिकण्यासाठी डॉ.आंबेडकर ज्या बंगल्यात वास्तव्यास होते तो बंगला, कोलंबिया विद्यापीठ (न्युयॉर्क) ग्रेज इन विद्यापीठ (जर्मनी) तर मध्यप्रदेशातील त्यांचे जन्मगाव महू, दिल्ली येथील 26 अलीपूर रोड येथील निवासस्थान आणि त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्यावर अत्यंसस्कार करण्यात आलेले ठिकाण म्हणजे चैत्यभूमी ही सर्व स्थळे बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत. महाराष्ट्रातल्या नागपूर येथील दीक्षाभूमी, येवला येथील मुक्तिभूमी, त्यांचे जन्मगाव आंबडवे स्फूर्तिभूमीआणि मुंबई येथील चैत्यभूमीला दरवर्षी लाखोंचा जनसागर जमतो. या स्थळांचा विकास महाराष्ट्र सरकारने केला आहे. नुकताच नागपूर येथील दीक्षाभूमीला वर्ग पर्यटनाचा दर्जा शासनाने दिला आहे. या सर्वच पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी देश-विदेशातून अनेकजण येत असतात.

जसजसे डॉ.आंबेडकरांचे विविध पैलू लोकांना समजत आहेत, तसतशी त्यांची किर्ती चहुमुखी गाजत आहे. म्हणून अनेक देशातील लोक म्हणतात, आमच्या देशात डॉ.आंबेडकर जन्मायला हवे होते, एवढी मोठी इतर देशांनी दखल घ्यावी अशी क्रांती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात केली आहे.

या देशाचे संविधान सर्वश्रेष्ठ संविधान आहे. त्याचाही अनेक देश गौरवाने उल्लेख करतात आणि आपसूकच संविधानाचे निर्माते म्हणून डॉ.आंबेडकरांचे नाव पुढे येते. संबंध देश या महापुरुषाच्या जन्माला 125 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी करीत असताना केंद्र सरकारने वर्षाआधीच डॉ.आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र व राज्य सरकारने यासाठी समित्या नियुक्त केल्या आहेत. केंद्र सरकारच्या समितीचे अध्यक्ष खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी पाच महत्त्वपूर्ण स्थळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. तीपंचतीर्थेम्हणून नावारूपाला येणार आहेत. या माध्यमातून डॉ.आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार नव्या पिढीसाठी एक अमूल्य ठेवा ठरणार आहे. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एका विशिष्ट समूहासाठी काम केले नाही तर त्यांनी सर्व शोषित, पीडित, वंचित उपेक्षित या वर्गांबरोबरच या देशातील सर्व लोकांकरिता काम केले आहे. म्हणून ते सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. शासनाने जी पंचतीर्थम्हणून विकसित करण्यासाठी स्थळे घेतली आहेत. त्यात 1) महू मधील स्मारक, 2) आंबडवे गाव, 3) दिल्ली येथील निवासस्थान, 4) इंदू मिल, 5) लंडन येथील घर यांचा समावेश आहे.

इंग्लंडमधील घर


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी काही देशात जावे लागले. 5 जुलै 1920 रोजी लंडनला ते उच्च शिक्षणाकरिता रवाना झाले. लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स एण्ड पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी एम.एस्सी.साठी प्रवेश मिळवला. त्या काळात अस्पृश्य समाजातील जन्म घेतलेला एकमेव विद्यार्थी या देशात शिक्षणाकरिता गेला होता. त्यांनी या संस्थेत एम.एस्सी. साठी प्रवेश मिळवला. तसेच ग्रेज इन या संस्थेतून बॅरिस्टरीचा अभ्यासही सुरू केला. लंडन विद्यापीठाने 1921 मध्ये म्हणजे 1 वर्षांनी त्यांना एम.एस्सी ही पदवी प्रदान केली. त्यानंतर त्यांनी पी.एच.डी.साठी द प्राब्लेम ऑफ रूपीहा प्रबंध लंडन विद्यापीठात सादर केला. त्यानंतर त्यांना 1922 मध्ये या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्सही पदवी बहाल केली.

डॉ.आंबेडकर 1921 ते 1922 अशी दोन वर्ष लंडनमध्ये किंग हेन्नी या मार्गावर एका घरात राहत होते. याच घरात त्यांनी रात्र-रात्र जागून अभ्यास केला. प्रसंगी उपाशी, अर्धपोटी राहून आपला उदरनिर्वाह केला. हे घर आज एक ऐतिहासिक स्मारक झाले आहे. नुकतेच हे घर राज्य शासनाने 35 कोटी रुपयाला खरेदी केले आहे. या घराला भेट देण्यासाठी अनेक जण इंग्लंडला जातात. या घराचे स्मारक करून इथेही डॉ.आंबेडकरांचा विचार सरकारला तेवत ठेवायचा आहे. आपल्या देशाव्यतिरिक्त परदेशातही डॉ.आंबेडकर यांच्या स्मृती प्रेरणास्थळ ठरल्या आहेत. कोलंबिया विद्यापीठाने द सिम्बॉल ऑफनॉलेज असे त्यांच्या पुतळ्याखाली लिहून ठेवले तर इंग्लंडच्या घरावर सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते डॉ.भीमराव रामजी आंबेडकर (1891-1956) यांनी 1921-1922 या घरात वास्तव्य केले अशी अक्षरे कोरली आहेत.

इंदू मिल


इंदू मिल ही मुंबईच्या दादरमध्ये आहे. याच भागात डॉ.आंबेडकरांचे राजगृहहे निवासस्थान होते. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे पार्थिव शरीर इथेच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. 7 डिसेंबर रोजी त्यांच्यावर दादर येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. बाबासाहेबांचे निवासस्थान राजगृह आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेले ठिकाण म्हणजे चैत्यभूमी हे दादर परिसरातच असल्याने 6 डिसेंबर रोजी त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी येथे मोठी गर्दी होते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य असे स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेवर व्हावे, अशी लाखो लोकांची अपेक्षा होती. म्हणून शासनाने या महापुरुषाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन इंदू मिलची 12 एकर जमीन डॉ.बाबासाहेब आंबेडरांच्या स्मारकासाठी दिली. नुकताच या स्मारकाचा पायाभरणी सभारंभ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होणार असून या स्मारकात स्मृती स्तूप, सभागृह, प्रेक्षकगृह, वास्तू संग्रहालय, ग्रंथालय, शोभिवंत बगिचा, वाहनतळ असणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हे स्मारक होत असल्याने या स्मारकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्त्वाचा इतिहास पुढील पिढीला समजण्यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल. या नियोजित स्मारकाला भेट देण्यासाठी परेल या लोकल रेल्वे स्टेशनवरून जाता येईल.

दिल्लीतील 26 अलिपूर रोड येथील निवासस्थान


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बरेच काळ देशाची राजधानी दिल्ली इथे वास्तव्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा देशाचे कायदामंत्री बनले तेव्हा दिल्लीमधील 26 अलिपूर रोड येथील निवासस्थान त्यांना देण्यात आले. इथेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयांवर लेखन केले. त्यामध्ये जो प्रसिद्ध ग्रंथ आहे तो बुद्धा अँड हिज धम्माबुद्ध और कार्ल मार्क्स,’ यांचा समावेश आहे. तसेच अनेक सामाजिक, राजकीय चळवळीच्या संदर्भात बैठकाही याच निवास्थानी बाबासाहेबांनी बोलविलेल्या होत्या. बाबासाहेबांनी जीवनभर खूप परिश्रम घेतले अभ्यास, चिंतन, दौरे लेखन याला त्यांनी संपूर्णत: वाहून घेतल्याने ते आजारी असायचे. त्यांना शुगरही होती. अचानकपणे वयाच्या 65व्या म्हणजेच 6 डिसेंबर 1956 रोजी रात्री झोपेतच डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या निधनाची वार्ता दुपारी आकाशवाणीवरून संबध देशभर पसरली. त्यांच्या निधनाने भारतीय समाजाचे हृदय हेलावले. अनेकांना खूप दु:ख झाले. दलित समाज तर पुरता शोकसागरात बुडाला. दीनदलितांच्या उद्धारकर्त्याचा अस्त झाल्याने अनेकांनी 26 अलिपूर रोड गाठून त्यांचे अत्यंदर्शन घेण्यासाठी रीघ लावली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यांच्या निवासस्थानाकडे गेले. पंडित नेहरू हे बाबासाहेबांना मत्रिमंडळातील सर्वांत हुशार, ज्ञानी मंत्री म्हणून संबोधत असत. डॉ. आंबेडकरांनी महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत अधिक वास्तव्य केल्याने व महाराष्ट्राचे ते मूळ रहिवासी असल्याने त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यंदर्शनासाठी त्यांचे शव खास विमानाने मुंबईला नेण्यात आले. त्यांच्यावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अत्यंसंस्काराला महाराष्ट्र व देशातील त्यांचे लाखो चाहते उपस्थित होते. मुंबईने पहिल्यांदाच एवढी विशाल अत्यंयात्रा अनुभवली. आज जिथे डॉ.आंबेडकरांवर अंत्यसंस्कार झाले ती जागा चैत्यभूमीम्हणून प्रसिद्ध आहे. 6 डिसेंबर रोजी त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी लाखो चाहते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे येतात.

दिल्ली येथील 26 अलिपूर रोड या स्थळाला डॉ. आंबेडकरांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याने हा त्यांचा बंगला एक ऐतिहासिक स्मारक ठरला आहे. या स्थळांचा केंद्र सरकारने आणखी विकास करण्याचे ठरविले आहे. इथे जाण्यासाठी दिल्ली मेट्रो आहे. दररोज सकाळी 9 ते रात्री 6 वाजेपर्यंत विधानसभा मेट्रो स्टेशनपर्यंत ट्रेनने जाऊन या ऐतिहासिक स्थळाला भेट देता येईल.

महू (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ)


डॉ.बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ यांनी पुण्यात आपले शिक्षण पूर्ण केले. पंतोजी शाळेमध्ये ते होते. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. नंतर शाळेत ते प्रधान शिक्षक झाले. त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. 14 वर्षे मुख्याध्यापकाचे काम सांभाळल्याने त्यांना सैन्यात मेजर (सुभेदार) म्हणून बढती मिळाली. नंतर ते महू इथे नोकरी निमित्त वास्तव्यास होते. कारण महूला (चहेु) मिलीटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर म्हणून ओळखले जाई. तेथेच डॉ. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला.

भीमाबाई यांच्या पोटी जन्म घेणारे डॉ.बाबासाहेब हे 14 वे अपत्य होते. भीमाबाई यांचे पुढे बाबासाहेबांच्या बालपणीच निधन झाले. (भीमाबाईची समाधी सातारा इथे आहे.) बाबासाहेबांचे नाव भीमअसे ठेवण्यात आले. नंतर भीमयांचे भीमराव आणि भीमराव यांना नंतर लोक आपले बाबासंबोधू लागले आणि नंतर ते सर्वांचे बाबासाहेब झाले. या भिमाचा सांभाळ डॉ.आंबेडकरांची आत्या मिराबाई हिने केला. हा भीम बुद्धिवान व्हावा, त्यांने दीनदलित समाजाचा उद्धार करावा अशी पिता रामजी सुभेदार यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी लहाणपणीच बाळ भीमयांच्यावर पाच मूल्यसंस्कार रुजवले होते. त्यामध्ये 1) शिक्षण, 2) शिस्त, 3) स्वावलंबन, 4) स्वाभिमान, 5) कठोर परिश्रम. या मूल्यांचा बाबासाहेबांनी आपल्या जीवनात अंगीकार केला आणि त्यानुसार वाटचाल केली आणि पुढे हा भीमया देशातील दीनदलितांचा उद्धारकर्ता, भारतीय राज्यघटनेचा निर्माता ठरला.

म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाला म्हणजे महूला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. महू इथे लाखो पर्यटक दरवर्षी भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्स्थळाला वंदन करीत असतात. महू इथे बाबासाहेबांच्या जन्मस्थळावर शासनाने यथोचित स्मारक उभे केले आहे. हे स्मारक एक चैतन्याचा झरा आहे.

महू येथे कसे जाल -
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून दोन ते तीन तासांच्या अंतरावर व इंदौर येथून 20 किलोमीटरच्या अंतरावर महू आहे.

आंबडवे


प्रत्येकालाच आपल्या गावाचा अभिमान वाटतो. डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील संस्मरणीय स्थळ म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे गाव होय. अतिशय कमी लोकवस्ती असलेले हे बाबासाहेबांच्या पूर्वजांचे गाव. इथे सपकाळ कुटुंबीय वास्तव्य करून राहते. या सपकाळ घराण्यातीलच डॉ.आंबेडकर. खरे तर त्यांच्या आडनावाची कहाणी मोठी रंजक आहे. बाबासाहेबांचे आडनाव सपकाळ. नंतर त्यांच्या वडलांनी बाबासाहेबांचे आडनाव सातारा येथील प्रतापसिंह शाळेत आंबाडवेकर असे 7 नोव्हेंबर 1900 रोजी नोंदवले. आजही 7 नोव्हेंबर हा शाळा दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकराचा शाळा प्रवेश दिनम्हणून साजरा होतो. कारण आजही शाळेत बाबासाहेबांचे नाव नोंदवलेले रजिस्टर आणि त्यांची स्वाक्षरी पाहावयास मिळते. या शाळेत त्यांना शिकवण्यासाठी आंबेडकर नावाचे शिक्षक होते. त्यांचे बालभीमावर खूप प्रेम होते. कारण बाबासाहेब लहाणपणापासून खूप चाणाक्ष, अभ्यासू आणि संस्कारक्षम विद्यार्थी होते म्हणून ते सातत्याने भीमाला जीव लावत असत. प्रसंगी त्यांना खाण्यासाठी घरून भाजी भाकरी आणत. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनीड वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबडवेकराचे आंबेडकर झाले. तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून बाळ भीमाचे नाव आंबेडकर झाले. इथे पुण्याच्या अशोक सर्वांगीण विकास संस्थेने अशोक स्तंभ आणि शीलालेख उभारून त्याला स्फूर्तिभूमी असे नाव दिले आहे. असे आंबाडवे हे डॉ.बाबासाहेबाचे गाव त्यांच्या आडनावामुळे आणि त्यांच्या मूळगावामुळे जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. आता हे गाव खासदार अमर साबळे यांनी दत्तक घेऊन या त्यांच्या मूळ गावाचा विकास हाती घेतला आहे. आंबडवे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे.

डॉ. आंबेडकरांशी संबंधित या पाचही स्थळांना पंचतीर्थेम्हणून घोषित करून या स्थळांचा विकास करण्याचा सरकारने जो संकल्प केला आहे. तो अत्यंत अभिनंदनीय स्वरूपाचा आहे. डॉ. आंबेडकरांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी भावी पिढीच्या हृदयात कोरवयाच्या असतील तर ही पंचतीर्थेमोलाची भूमिका पार पाडू शकतील, यात शंकाच नाही!

बाबासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय दिला. बाबासाहेब हे फक्त दलितांचे नव्हे तर जगातील सर्व शोषितांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी देशाला संविधान दिले. त्यामुळे त्यांच्या या कार्याची प्रेरणा आणि त्याबाबतची माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या पंचस्थळांचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे - नरेंद्र मोदी, पंतप्रधान


- बबन जोगदंड,
(
लेखक हे यशदा संस्थेत संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
संपर्क : 09823338266

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा