महान्यूज
तलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक मंगळवार, २० डिसेंबर, २०१६
आदिवासी शेतकऱ्यांना फायदा

बळीराम जैतू उघडे हे कल्याण तालुक्यातील कांबा येथील स्थानिक भूमिपुत्र आहेत. आदिवासी समाजातील आहेत. ४५ वर्षांच्या बळीराम यांना या पूर्वी जवळपास प्रत्येक उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता, कांबा गावाची लोकसंख्या 1500 आहे.

बळीराम म्हणाले की, कांबा येथील तलावातील गाळ काढल्यामुळे पहिला फायदा आम्हाला असा झाला की, तलावातील गाळाची माती शेतात टाकल्याने शेत जमिनीचा कस वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय या गाळाने भरलेल्या तलावालाही आता मोकळा श्वास मिळणार आहे. पावसाळ्यातील भातशेतीचे उत्पन्न घेतल्यानंतर आम्ही आदिवासी बांधव काकडी, खरबूज, दुधी, भेंडी, वांगी तसेच हरभरे, वाल, तुरीचेही भरघोस उत्पादन घेणार आहोत. आमचा पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आला आहे. जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही. जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचा हा जो उपक्रम केला त्यामुळे आमचे रोजगारासाठीचे भटकंतीचे दिवसही थांबणार आहेत...

ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यांत यंदा उन्हाळ्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. गेली वर्षभर जलयुक्त शिवाराची कामे सुरु होती. गावकरी देखील उत्साहाने आपला सहभाग देत होते. आता या भागातील गावांमधील शेतकरी जलयुक्त शिवार अभियानाबद्दल भरभरून बोलत आहेत.

तसा ठाणे जिल्हा हा भात पिकाचा. पण शेतकरी आता नवनवीन प्रयोग करण्याच्या मनस्थितीत आहेत. भाजीपाला मोठ्या प्रमाणावर कसा घेता येईल याचा विचार सुरु आहे. गेली काही वर्षे टंचाई परिस्थितीमुळे शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना यंदा जलयुक्त शिवार अभियानामुळे भरघोस उत्पादन मिळण्याची आशा आहे. त्यामुळे या अभियानाबद्दल शेतकरी राज्य शासनाचे आभार मानताना दिसले. पुरेसे पाणी मिळाल्यामुळे खरीप हंगामात समाधानकारक उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून शिवार फुलविण्याच्या तयारीला ते लागले आहे. त्यांना आता पाणी टंचाईची अथवा नापिकीची कोणतीही चिंता सतावत नसल्याचे यावेळी जाणवले.

-अनिरुद्ध अष्टपुत्रे
जिल्हा माहिती अधिकारी. ठाणे
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा