महान्यूज
लोकसहभागातून नदी स्वच्छतेचा ‘नारायणगाव पॅटर्न’ सोमवार, १७ जुलै, २०१७
ग्रामविकासासाठी शासनाकडून अनेक योजना आखल्या जातात. त्या योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी अनेक उपाय योजले जातात. त्या योजना कागदावरच राहू नयेत, यासाठीही राज्य शासन या योजनांचा पाठपुरावा करीत आहे. शासनाच्या योजना गावपातळीवर जाण्यासाठी केवळ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम नाही तर जनतेचाही यात सहभाग आवश्यक आहे.

यामुळेच ‘लोकसहभागातून ग्रामविकास’, ‘लोकसहभागातून परिवर्तन’ हा नारा अनेक गावातील उद्योजक, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्विकारलेला दिसतो आहे. त्यातून ग्रामस्वच्छता असेल, वृक्षारोपण असेल, सामुदायिक विवाह सोहळे असतील किंवा सांडपाणी व्यवस्थापन असे अनेक उपक्रम सध्या गावपातळीवर राबविले जात आहेत. त्यातून गाव सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी प्रयत्न होतात आणि एका गावाने नियोजनबद्ध तयार केलेला कार्यक्रम हा पुढे पॅटर्न म्हणून ओळखला जातो. असे महाराष्ट्रात अनेक पॅटर्न विविध गावांनी तयार केलेले आहेत आणि त्याचा इतर गावांनी स्विकार केलेला आहे. मग तो राळेगणसिद्धी, हिवरे बाजार या गावचे ग्राम समृद्धी पॅटर्न असो, जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न असो किंवा इतर अनेक गावचे असे ग्रामविकास पॅटर्न असोत. त्यातूनच इतर गावे प्रेरणा घेऊन विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

असाच लोकसहभागातून नदी स्वच्छतेचा पॅटर्न तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील ‘नारायणगाव’ येथील मीना नदी स्वच्छतेसाठी राबवला गेला. या अभियानाचे उद्घाटन जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून 7 एप्रिल रोजी डॉ. सदानंद राऊत व नदी स्वच्छता अभियानाचे मुख्य प्रवर्तक दीपक वारुळे यांच्या हस्ते करण्यात आले. लोकसहभागाच्या या अभियानाला नागरिकांनी न मागता भरभरुन सहाय्य केले. ग्रामपंचायत नारायणगाव आणि वारुळवाडी या मीना नदीच्या तिरावर वसलेल्या दोन्ही गावातील सरपंच, उपसरपंच आणि गावातील मान्यवर मंडळींच्या आर्थिक हातभाराने तसेच डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, ग्रामोन्नती मंडळ, शिक्षक वृंद, लायन्स क्लब, रोटरी क्लब, राजगुरुनगर बँक, लाला अर्बन बँक, जयहिंद पतसंस्था, वसंतदादा पतसंस्था, विरोबा पतसंस्था, श्रीराम पतसंस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान, महिला मंडळ, बचत गट, विघ्नहर साखर कारखाना, पोलीस स्टेशन, जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे तसेच कुणी वाढदिवसानिमित्त, कुणी स्मरणार्थ आणि परिसरातील विविध सहकारी, सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी, उद्योजक, व्यापारी व काहींनी व्यक्तिगत पातळीवर मोठी रक्कम अभियानाला देऊन या लोकसहभागाच्या उपक्रमास हातभार लावला. त्यामुळेच नदी स्वच्छता अभियानाचे प्रवर्तक दीपक वारुळे, जितेंद्र गुंजाळ, संतोष वाजगे व जंगल कोल्हे यांच्या नियोजनबद्ध संकल्पामुळे 75 दिवस काम सुरु ठेऊन जवळपास दोन किलोमीटरपर्यंतचा नदी परिसर स्वच्छतेचा उपक्रम सहा टप्प्यांत यशस्वीपणे राबवण्यात आला.

या अभियानाला जुन्नर, आंबेगाव, खेड, संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी भेटी देऊन कामाचे कौतुक केले. त्यात खेडचे आमदार सुरेश गोरे, जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे व राजगुरुनगर बँकेचे चेअरमन किरण आहेर यांनी खेड व आळंदीमध्ये तर संगमनेरचे उद्योजक संजय मालपाणी व गिरीष मालपाणी यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून संगमनेरमध्ये ‘नदी स्वच्छतेचा नारायणगाव पॅटर्न’ नदी स्वच्छता अभियानासाठी राबवणार असल्याचे सांगितले. तसेच तहसीलदार व प्रांताधिकारी यांनीही काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

गावची जीवनदायिनी स्वच्छ करुन नारायणगावने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यातून इतर गावांनी प्रेरणा घेऊन आपापल्या गावात हा पॅटर्न राबवला तर दिवसेंदिवस अस्वच्छतेकडे चाललेली नद्यांची वाटचाल नक्कीच थांबेल आणि आपला गावही नक्कीच सुजलाम होईल.

नारायणगावने लोकसहभागातून हे अभियान यशस्वी केले आहेच पण आता शासनाने लक्ष घालून या गावांना सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारा जलशुद्धीकरण प्रकल्प बसविण्यासाठी लवकरात लवकर मदत करणे आवश्यक आहे. तसेच गावातील नागरिकांनीही नदीपात्रात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये त्याची योग्य विल्हेवाट लावावी व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. तसेच शाळा-महाविद्यालय व पालकांकडून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी. अन्यथा नदीची परिस्थिती थोड्याच दिवसात जैसे थे होईल.

-अशफाक पटेल,
नारायणगाव, ता. जुन्नर, जि.पुणे.
ashfakpatel29@gmail.com
७७०९ ९३ ९३ ९३
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा