महान्यूज
जलयुक्त शिवार : लोकसहभागातून पुढे जाणारे अभियान मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

कमी-अधिक पर्जन्यमान, पावसात येत असलेला खंड, पावसाची अनियमितता यामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य कायमस्वरुपी टंचाईमुक्त व टँकरमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. या योजनेला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कृषीक्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीबाबत राज्यातील सर्वच विभागातील परिस्थितीचा मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेवून प्रगती जाणून घेतात. जलयुक्त शिवारासाठी आलेला निधी वेळेवर खर्च झाला किंवा नाही, या निधीतून चांगल्या प्रकारचे कामे झाली किंवा नाहीत याबाबत सविस्तर आढावा घेतला जातो.

जलयुक्त शिवारचे नागपूर विभागात सन 2015-16 व ऑगस्ट 2017 पर्यंत झालेल्या कामांबाबत सद्य:परिस्थितीबाबत या लेखात थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन 2015-16 या वर्षापासून पुढील पाच वर्षे दरवर्षी 5 हजार गावांची निवड टंचाईमुक्त करण्यासाठीचे धोरण राज्य शासनाने निश्चित केले आहे. अशाप्रकारे पाच वर्षांत राज्यातील 25 हजार गावांमधील टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येत आहे. सन 2015-16 यावर्षी 6 हजार 202 गावांची निवड करण्यात आली होती. तर 2016-17 या वर्षासाठी 5 हजार 281 गावांची निवड करण्यात आली आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमधील पाण्याचा ताळेबंद तयार करुन गावात पाण्याची उपलब्धता व आवश्यकता किती आहे व त्याकरिता कोणकोणते तंत्रज्ञान अवलंबविण्याची आवश्यकता आहे. हे शिवार फेरी करुन ठरविण्यात येते. त्यानुसार गावाचा आराखडा तयार करण्यात येतो. आराखड्यास जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांची मान्यता घेण्यात आल्यानंतर गावातील कामांना सुरुवात होते. गाव शिवारातील वाहून जाणारे पाणी विविध पद्धतीने शिवारातच अडविले जाऊन गावामध्ये विकेंद्रित स्वरुपाचे पाणीसाठे निर्माण करणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 1 हजार 77 गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये एकूण 23 हजार 759 कामे सुरु करण्यात आली होती. त्यापैकी 23 हजार 603 कामे पूर्ण झाली असून 156 कामे प्रगतीपथावर आहेत. यातून 1 लाख 78 हजार 800 टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. व त्यामुळे 83 हजार 724 हेक्टर क्षेत्र हंगामी सिंचनाखाली आले आहे.

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन 2016-17 मध्ये नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 915 गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये एकूण 21 हजार 474 कामे सुरु करण्यात आली. त्यापैकी ऑगस्ट 2017 अखेर 19 हजार 498 कामे पूर्ण झाली असून 1 हजार 82 कामे प्रगतीपथावर आहेत. या अभियानातील गाळ काढण्याच्या कामात शासनाबरोबरच लोकसहभागही फार मोठ्या प्रमाणावर लाभत आहे. हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत यंदा नागपूर जिल्ह्यात माहे ऑगस्ट अखेर 185 गावापैकी 119 गावांत शंभर टक्के तर 66 गावांत 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. भंडारा जिल्ह्यात 59 गावांपैकी 43 गावांमध्ये शंभर टक्के कामे पूर्ण झाली असून, 18 गावांमध्ये 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. गोंदिया जिल्ह्यात 77 गावांपैकी 74 गावात शंभर टक्के तर 3 गावांमध्ये 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 213 गावांपैकी 117 गावे 100 टक्के तर 31 गावांमध्ये 50 टक्के कामे झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील 169 गावांपैकी 91 गावांमध्ये 100 टक्के कामे झाली असून 64 गावांमध्ये 80 टक्के तर 13 गावांमध्ये 50 टक्के कामे झाली आहेत. तर वर्धा जिल्ह्यात 212 गावांपैकी 135 गावांमध्ये 100 टक्के कामे झालेली असून 68 गावांमध्ये 80 टक्के तर 6 गावांमध्ये 50 टक्के कामे झालेली आहेत.

सन 2016-17 या वर्षात शासनाकडून 271.32 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. तसेच विशेष निधी व अभिसरणाद्वारे उपलब्ध झालेल्या निधीमधून 305.79 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नागपूर विभागात सन 2016-17 मध्ये 51 हजार 839 टीएमसी पाणी साठा क्षमता निर्माण झाली असून 26 हजार 388 हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. या योजनेत लोकसहभाग असावा यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागातील बहुतेक सर्व जिल्ह्यातील विविध कामांना भेटी देवुन लोकसहभागाचे कौतुक केले आहे. लोकसहभागातील सातत्य टिकविणे आणि या अभियानाला आलेले लोकचळवळीचे रुप टिकविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

शब्दांकन - जगन्नाथ पाटील, सहाय्यक संचालक, विमाका, नागपूर.'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा