महान्यूज
एक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड शनिवार, १८ मार्च, २०१७
• 59 शेततळ्यांचे निर्माण

बेभरवशाचा नि बेमोसमी पाऊस... पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल... यामुळे उद्भवत असलेली दुष्काळाची विदारक परिस्थिती... या साऱ्या नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान सर्वांसाठी दिलासादायक आणि हरितक्रांतीचे नवे पर्व निर्माण करणारे ठरले आहे. सरकारने उचललेल्या या क्रांतिकारी पावलाने शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग गवसला आहे. त्याचे खरेखुरे चित्र येऊलखेड या गावात पाहायला मिळत आहे. कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत येऊलखेड येथे तब्बल ५९ शेततळी निर्माण करण्यात आली आहेत. 'जलयुक्त'चा हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आल्याने सुमारे दीडशे हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे. पर्यायाने पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांची आर्थिक बाजूदेखील मजबूत होण्यास हातभार लागला आहे.

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सर्वाधिक ५९ शेततळे असलेले येऊलखेड (ता. शेगाव) हे एकमेव गाव आहे. कोरडवाहू शेती अभियान व विदर्भ सघन सिंचन कार्यक्रमांतर्गत येऊलखेडची जलयुक्त शिवार अभियान समितीने शंभर टक्के अनुदान योजनेमध्ये निवड केली. त्यानंतर २०१६ मध्ये शेततळे निर्मितीची मोहीम हाती घेण्यात आली.

शेततळ्यांनी या गावाला एक वेगळी ओळख निर्माण करवून दिली आहे. लांबी व रुंदी ३० बाय ३० आणि खोली ३ मीटर अशा आकाराच्या शेततळ्यासाठी ८० हजार रुपये खर्च येतो. गाव शिवारातील ५९ शेततळ्यांसाठी ४० लाख ४९ हजार रुपये खर्च आला. शेततळ्यामध्ये १०२ टीसीएम पाणी साठविल्या जाते. बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्तमधून १९६ शेततळी तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये येऊलखेडमध्ये ५९ शेततळे आहेत.

त्याचप्रमाणे झाडेगाव येथे १८, टाकळी पिंपळचोच १२, जळगाव जामोद तालुक्यात ११ व संग्रामपूर तालुक्यामध्ये ७ शेततळे उभारण्यात आले. येऊलखेड ग्रामस्थांची प्रचंड मेहनत त्यांना सफलतेच्या मार्गाने घेऊन गेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन व कृषी विभागाने घेतलेला पुढाकारसुद्धा विसरता येणार नाही. शासनाने सुरू केलेली ही योजनाच शेतकऱ्यांचं चांगभलं करणारी म्हणावी लागेल. ठिबक व तुषार संचाद्वारे शेततळ्यांमधून पाण्याचा उपसा केला जातो. कोरडवाहू शेतात भरघोस उत्पादन होत असल्याने शेततळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेत. शेततळ्यांनी या गावात हरितक्रांती घडविली आहे. कास्तकारांनी रूंद सरी वाफा पद्धतीने मूग, उडीद, सोयाबीनची पेरणी करून खरीप पीक काढले. हे गाव खारपाणपट्ट्यात येत असल्याने पाण्यात क्षाराचे प्रमाण खूप आहे. शेतीला जास्त पाणी दिल्यास जमिनी खारवटतात. त्यामुळे सुक्ष्म व ठिंबक सिंचनाचा वापर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे जमिनीची पोत व पाण्याची बचत या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या आहेत. कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून दिल्याने आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे.

गावात ८ शेडनेट, ३ मिनी ट्रॅक्टर, १ मोठे ट्रॅक्टर, ७ रोटाव्हेटर, पेरणी यंत्र (सरी वरंबा पद्धतीचे), अडीच हजार पाइप, पॅक हाऊस देण्यात आले असून, आणखीही साहित्य देण्याचा प्रयत्न आहे.

कोट्यवधींच्या उत्पन्नामुळे गाव भरभराटीस येऊन या गावाची महाराष्ट्राच्या नकाशावर 'जलयुक्त शिवार' योजनेतील पहिले गाव म्हणून ओळख निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे येऊलखेडवासी बोलून दाखवितात.

शंभर टक्के अनुदानावरील शेततळे घेऊन आपला व कुटुंबाचा, पर्यायाने गावाचा विकास साधण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, मंडळ कृषी अधिकारी आर.एम. झामरे, कृषी सहायक डी.के.देशमुख यांनी केले.

शंभर एकरावर 'ओवा'ची लागवड अन्य पिके घेतल्यानंतर तीन महिन्यांत व कमी पाण्यामध्ये येणारे ओव्याचे पीक घेण्यास शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. सुमारे ५० शेतकऱ्यांनी शंभर एकरावर ओव्याची लागवड केली आहे. ओव्याला एकरी १७ हजार रुपये क्विंटल भाव मिळतो. एका एकरामध्ये चार क्विंटल ओव्याचे उत्पादन होते. त्यामुळे एकरभरात ७० हजारांचे उत्पन्न होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी बोलून दाखविला. गतवर्षी हरिभाऊ खुपसे यांनी ओवा पीक घेऊन एकरी १ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला. शेततळ्यावरच शशी पुंडकर यांनी लीली व पेरुची बाग लावली होती. एकात्मिक पीक पद्धतीने फळबाग, फुलशेती, पॅकहाऊस, शेडनेट हाऊसमध्ये भाजीपाला, मत्स्य शेती, कडधान्य, मूग, उडीद, सोयाबीन असे खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना केवळ शेततळ्यांमुळे सोपे झाले आहे. संतोष पुंडकर, योगेश पुंडकर, सदू पुंडकर, हरिभाऊ माळी, भास्कर पुंडकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्याचा पुरेपूर उपयोग घेऊन 'अर्थ'क्रांतीकडे झेप घेण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते.

-सचिन लहाने,
बुलडाणा
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा