महान्यूज
बटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग : विरली खंदारच्या शेतकऱ्यांनी स्थापन केली कंपनी शनिवार, ०२ एप्रिल, २०१६

धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आता सामूहिक शेतीच्या प्रयोगासोबतच वैविध्यपूर्ण पिकांची लागवड करीत आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. लाखांदूर तालुक्यातील विरली खंदार येथील नामदेव लांजेवार या शेतकऱ्याने पुढाकार घेत गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करुन सामूहिक बटाटा लागवडीच्या माध्यमातूनन वेगळा पायंडा पाडला आहे.

 

भंडारा जिल्ह्यात 1 लक्ष 85 हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड करण्यात येते. मात्र खरीप पिकानंतर रब्बी पीक घेण्याचे प्रमाण येथे केवळ 20 टक्के आहे. शेतकऱ्यांमध्ये रब्बी पीक घेण्याविषयी कृषी विभाग आणि आत्माच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे नामदेव लांजेवार यांनी पवनी आणि लाखांदुर तालुक्यातील सुमारे 500 शेतकऱ्यांना सोबत घेऊन ‘सप्तरंगी फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ स्थापन केली. याच कंपनीतील विरली खंदार येथील 40 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रब्बीमधे 42 एकरावर बटाट्याची सामुहिक शेती केली.

 

धान निघाल्यावर लगेचच नोव्हेंबर महिन्यात चिप्सोना जातीच्या बटाट्याची 26 बाय 6 इंचावर लागवड केली. यासाठी सामूहिक बियाणे खरेदी केले. चिप्सोना जातीचे बियाणे पंजाबहून मागविण्यासाठी आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे यांनी सहकार्य केले. खत आणि औषधांची सुद्धा सामूहिक खरेदी करुन पिकांची जोपासना केली. बटाटे हे पीक तीन महिन्यातच येते. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर पैसा मिळतो.

 

माल विक्रीसाठी सप्तरंगी कंपनीने पुणे येथील सिद्धी विनायक ॲग्री प्रोसेसर या खाजगी कंपनीशी करार केला. कंपनीने माल शेतातूनच उचल केल्यामुळे शेतकऱ्यांचा त्यासाठीचा वाहतूक आणि आडत खर्च वाचला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही कंपनीने दिले.

 

यासाठी शेतकऱ्यांना एकरी 35 ते 40 हजार खर्च आला असून एकरी 10 टन उत्पादन निघाले. 7 रुपये किलो प्रमाणे दर मिळाल्याने एकरी 70 हजार रुपयांचे उत्पन्न झाले. सामूहिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना एकरी 30 ते 40 हजार नफा झाला आहे. विरली खंदार येथील शेतकऱ्यांचा सामुहिक शेतीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे.

 

सामूहिक शेतीमुळे शेतकऱ्यांना एकमेकांचा आधार मिळाला. तसेच शेतीतूनच मालाची उचल झाल्यामुळे शेतकऱ्यांची पायपीट वाचली. मुख्य म्हणजे धानशेतीसाठी भरपूर पाण्याची गरज असते. तर बटाटा हे पीक कमी पाण्यात येते. पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना ठिबक पद्धतीने बटाटा लागवड करण्याचा संकल्प आहे. तसेच बटाट्यासाठी शितगृहाची व्यवस्था असल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा होऊ शकतो.

-नामदेव लांजेवार

शेतकरी आणि अध्यक्ष सप्तरंगी फार्मर प्रोडयुसर कंपनी

 

शेतकऱ्याने उत्पादन केलेल्या मालाला योग्य दर मिळत नाही आणि दलालांची मोठी साखळी असते. हा प्रकार टाळण्यासाठी सामूहिक शेतीची संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली आहे. यावर्षी मिळालेल्या यशानंतर आणखी शेतकरी यामध्ये जुळले तर शेतकऱ्यांची बटाटा प्रोसेसिंग कंपनी करण्याचे ध्येय आहे.

-प्रज्ञा गोडघाटे

प्रकल्प संचालक (आत्मा)

 

-मनीषा सावळे

जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा