महान्यूज
कर्णबधिरांची बोलकी शाळा शनिवार, ०३ सप्टेंबर, २०१६
शिक्षक दिनानिमित्त, 'द सेंट्रल स्कूल फॉर द डिफ' च्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका शोभा नाखरे यांचे मनोगत, खास महान्यूजच्या वाचकांसाठी…

शुभम् आणि पूजा, कर्णबधिर बहीणभावंड ! त्यांना घेऊन आई परभरणीहून शाळेचा पत्ता शोधत आली. लिफ्टने वर आले तेव्हा शाळेत जेवायची सुट्टी होती. मुलांचा गोंगाट, आरडाओरडा चालू होता, तो ऐकल्यावर आईला वाटलं, “ही कर्णबधिर मुलांची शाळा, मग एवढा आवाज ? आपण पत्ता चुकलो, परत लिफ्टने खाली गेली. पत्ता, नाव बरोबर होतं.

'द सेंट्रल सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ द डिफ' गेली 50 वर्षे कर्णबधिर मुलांच्या उत्कर्षासाठी त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी पाया घडवणारी संस्था. वय वर्षे 2 ते 12 या वयोगटातली मुलं. चौथीपर्यंतच्या शाळेच्या अभ्यासाचा, पर्यायाने भाषेचा, ज्ञानाचा, श्रवणाचा, बोलण्याचा पाया पक्का करून मुलांना शाळेच्या शैक्षणिक प्रवाहात (विशेष शाळेतून) पाठवले जाते.

मुंबईतल्या मुंबई सेंट्रल व भायखळा स्टेशनच्या दरम्यान आग्रीपाडा येथे असलेल्या शाळेत खूप लांबून मुलं रोज येतात. पनवेल, कल्याण, नेरळ, बोईसर, डहाणू, विरार, डोंबिवली इ. तसेच महाराष्ट्रातल्या अकोला, धुळे, इचलकरंजी, सांगली औरंगाबाद, नागपूर इ. ठिकाणहून येऊन मुलं प्रवेश घेतात.

इतक्या छोट्या मुलांना एवढ्या लांब आणण्याचं कारण तरी काय ? असा प्रश्न मनात आला तर त्याचं उत्तर आहे ‘मौखिक अध्यापन’. मुलांना पूर्णपणे बोलून शिकवलं जाताना, मुलांकडूनही पूर्णपणे बोलण्याची अपेक्षा केली जाते. ‘पूर्णपणे मौखिकता’ हेच शाळेचं वैशिष्ट्य ! हातवारे, खाणाखुणा यांचा उपयोग न करता पूर्णपणे बोलण्यावर भर ! हेच सेंट्रल स्कूल फॉर द् डिफ या शाळेचं वैशिष्ट्य.

शाळेत संभाषण पद्धतीने शिकवलं जातं मूल शाळेत येतं त्यावेळी त्याला बिल्कुल बोलता न येणं, शब्दसंग्रह मुळीच नसणं, हे वास्तव ! पण शाळेत आल्यावर मात्र खेळ, विविध व्यवसाय श्रवणप्रशिक्षण यातून हळूहळू भाषा, शब्दसंग्रह वाढत जातो, शिक्षिका सातत्याने बोलून, मुलाकडून सुरूवातीला किमान आवाज काढण्याची अपेक्षा करते. यासाठी मुलाकडून काय अपेक्षा केली जाते? तर आलेल्या बहुतांश मुलांचा श्रवणऱ्हास अतितीव्र स्वरुपाचा असतो. यासाठी गरज असते ती उत्तम डिजिटल श्रवणयंत्र असण्याची प्रत्येक मुलाला थोडी तरी उर्वरित श्रवणशक्ती असते. तिला चेतना देऊन, सतत उद्दीपीत करून मुलांना आवाज ऐकण्याची सतत सवय केली जाते. ऐकणं आणि बोलणं या एकाच नाण्याच्या बाजू ! अशा मशिनच्या जोडीची किंमत 60 हजार ते 1 लाख 50 हजार.

संभाषण पद्धतीत मुलांचा जो सहज संवाद थांबतो तो इथे घेतला जातो. सुरूवातील बाळ लहान असताना ज्याप्रमाणे आईच प्रश्न विचारून बाळाचं उत्तरही तीच देते. (भूकू लागली कां बाळाला? हो-हो, चला दू-दू पिऊया—याप्रमाणे) या पद्धतीने ने मुलाच्या संभाषणाची सुरवात होते. मुलाच्या प्रत्येक खुणेला शिक्षिका शब्द देते. यातून शिक्षकाशी वेगळं नातं घडून मूल कळीच्या फुलात होणाऱ्या बदलाप्रमाणे मूल फुलू लागतं. घरून मोटार, बॉल असं ‘आपलं काहीतरी’ शाळेत आणू लागतं, त्यावर दोन तीन उद्गाराचं संभाषण होतं. मग या संभाषणावर व्यवसाय होतात. म्हणजेच फॉलो अप. ती भाषा विविध विषयात वापरली जाऊन पुनरावृत्ती होते. सर्व विषयाशी त्यावर व्यवसाय होतात. सर्व बाजूंनी ती भाषा कळून हळू-हळू मुलंही बोलायला लागतात. हे संभाषण गणित, विज्ञान, श्रवण, लेखन इतिहास, भूगोल यांच्याशी जोडले जाते. या सर्वांसाठी आवश्यक गोष्ट म्हणजे पुनरावृत्ती आणि श्रवण.

निम्न आर्थिक स्तरातल्या पालकांना एवढी महाग मशिन्स परवडतच नाहीत. शिवाय एवढ्या महाग मशिनचे आयुष्य साधारणत: 5 वर्षे यासाठी धर्मादाय संस्था, दानशूर व्यक्ती मदत करतात. आणि ही एक गोष्ट महत्त्वाची ठरते, म्हणजे पालकांचा सहभाग ! शाळेत झालेल्या गोष्टींची सतत घरी पुनरावृत्ती झाल्याशिवाय मुलांच्या लक्षात राहू शकत नाही. पालक मेहनत घ्यायला तयार असणं, हा प्रवेशाचाच निकष आहे. शाळेत सर्व सण साजरे केले जातात. मुलांकडून छोटा नाच, नाटुकले बसवून घेतले जाते. वेशभूषा, चित्रकला, कविता पाठांतर वक्तृत्व इ.स्पर्धा, पोहोचण्यासाठी दर गुरुवारी एकतास. (ज्यामुळे श्र्वासावर नियंत्रण येते) रोज नवा अनुभव, सृजनात्मक व्यवसाय, खेळ यातून मुलं घडतात. वाचन, लेखन, वाचा, भाषा यांचा विकास होतो.

पाया पक्का झाल्यावर काय होते ? आजवर शाळेतल्या 9 मुलांना ‘मिडलस्कूल स्कॉलरशिप’ परिक्षेत व मुंबईत नंबर मिळालाय. शाळेतल्या 16 मुलांना गेल्यावर्षी ‘महाराष्ट्र प्रज्ञा शोध’ परीक्षेला प्रथमच बसवले. तिथेही सात मुलांनी मुंबईत क्रमांक मिळवले. याच मुलांनी आकाशवाणीवर दोनवेळा ‘गंमत-जंमत’ मध्ये अर्ध्या तासाचा कार्यक्रम सादर केला, ज्याचं एकाच फटक्यात रेकॉर्डिग झालं.

मुलं आंतरशालेय स्पर्धात भाग घेऊन यश मिळवतातच. पण इतर सामाजिक संस्थांच्या स्पर्धातही यशस्वी होतात. माहिम सार्वजनिक वाचनालयातर्फे वीरकथाकथन, चुटकुला सांगणे, कविता म्हणजे यात यशस्वी झाली. फ्रेण्डस ऑफ द ट्रीज, मुंबई ट्रॅफीक पोलीस यांच्या स्पर्धातही बक्षिसे मिळवतात. अगदी 10 संस्कृत श्लोक म्हणण्यातही यश मिळवले.

चौथीनंतर घराजवळच्या शाळेत जाऊन आपले गुण दाखवतात. शाळेत प्रवेश देण्यासाठी कुरकूर करणाऱ्या शाळेत शरण्या मनोहरन ह्या मुलीला प्रेशियस जेम ऑफ द इअर (2015-16) देऊन गौरवले. बहुतांश मुले विविध स्पर्धात, हस्ताक्षरात बक्षिसं मिळवतात. पुढेही अनंत अडचणींवर मात करून उच्च शिक्षणही घेतात. आज आमचे कितीतरी विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. एमबीए/एमसीए/इंजिनिअर /कम्प्युटर शिक्षक / डिझायनर/ एमए/ आर्किटेक्ट, पदवीधर झाले आहेत.टीआयएफआर/ रेल्वे /बेस्ट खाजगी आस्थापनातून नोकरी करत आहेत. काहीजण स्वत:चा व्यवसाय करत आहेत. विविध क्षेत्रात नावही कमावले आहेत. लता नायक ही आमची विद्यार्थीनी रेल्वेत काम करते. तिला आजवर 15 वेळा बेस्ट एम्प्लॉई अॅवॉर्ड मिळाले आहे. तिचाच भाऊ जलतरणपटू तारानाथ शेणॉय. अर्जुन पुरस्कार, छत्रपती पुरस्कार, पद्मश्री पुरस्काराचा मानकरी. तो तर अंशत: शाळेच्या या सर्व उज्ज्वल इतिहासाचा पाया. श्री. पारख दांपत्याने आपल्या घरी घातला. घरात सुरु झालेल्या या शाळेचे (1966) 2005 पर्यंत शिक्षक प्रशिक्षण कॉलेज देखील होते. जवळ-जवळ 500 शिक्षक प्रशिक्षित होऊन महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. ‘मैत्री’ नावाचे शिशुकेंद्र असून बेरा चाचणी विनामुल्य केली जाते. कॉकलिअर इम्प्लांट ऑपरेशन झालेल्या मुलांसाठी मॅपिंग सुविधा आहे. संस्थेचा पत्रद्वारा मार्गदर्शन अभ्यासक्रम, शाळा असे उपक्रम इथे राबवले जातात.

संस्थेच्या अध्यक्षा मेरी बेहली होमजी स्वत: प्रशिक्षित असून पारख दांपत्याच्या कन्या आहेत. संचालिका श्रीमती शुभदा बुर्डे असून भारतभरातील शिक्षकांना प्रशिक्षण देणे, उपक्रमात व्याख्याने, आरसीआय या दिल्लीतील संस्थेत ओरॅलिझम च्या मुख्य वक्त्या आहेत. तसेच एनसीईडी इंडिया या राष्ट्रीय संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत. नुकताच “कुलाबा महिला विकास मंडळाचा ” कार्यगौरव पुरस्कार शाळेला मिळालेला आहे. येथील शिक्षिका सतत नाविण्याच्या शोधात असून आजवर 10 ते 12 वेळा राष्ट्रीय परिषदेत पेपर सादर केला असून त्यात 6 ते 7 वेळा बेस्ट पेपर ॲवॉर्ड ही मिळाले आहे. मुख्याध्यापिका शोभा नाखरे यांना राष्ट्रपती पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. समाजात जनजागृती करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.

या संभाषण पद्धतीने सामान्य शाळेत शिकवल्यावरही खूप फायदे होतात हे आम्ही पुराव्याने राष्ट्रीय कार्यशाळेत मांडले आहे. या संस्थेचा लाभ, जास्तीत जास्त मुलांनी घेण्यासाठी हा प्रयास !

-शोभा नाखरे
प्राचार्य,
द सेंट्रल स्कूल फॉर द डिफ
आग्रीपाडा, मुंबई - 400011
फोन नंबर :०२२- 23088879
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा