महान्यूज
शेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य मंगळवार, २८ जून, २०१६
केलवडचे शेतकरी शिवाजी वाघे यांची यशकथा

थोडी मेहनत, थोडे नियोजन व थोडे मार्गदर्शन या त्रिसुत्रीतून केलवड (ता. राहाता) येथील शिवाजी वाघे यांची भाजीपाल्याची शेती बहरली. नुसती बहरलीच नाही तर टंचाईस्थितीत बाजारपेठ मिळवली. भाजीपाला शेतीतून प्रगती साधणाऱ्या वाघे कुटुंबाने शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या शेततळ्यासाठीच्या योजनेचा लाभ टंचाईस्थितीत शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी ज्या पद्धतीने करून घेतला, तसा तो अन्य शेतकऱ्यांनी करून घेतला, तर वाघे यांच्या शेतीत जी प्रगती झाली तीच प्रगती इतर शेतकऱ्यांच्या शेतीत होऊ शकते, याचा वस्तुपाठच शिवाजी वाघे यांच्या एकत्रित कुटुंबाने समोर ठेवला आहे.

शेतीत शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी पाणी महत्वाचे. पाण्याची सोय झाली तरच अपेक्षित उत्पादन मिळविता येऊ शकते. हे लक्षात आल्यानंतर पाणी कसे उपलब्ध करता येईल, यावर मंथन केले. त्यामधून शेततळ्याचा पर्याय पुढे आला. शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत 34 बाय 34 आकाराचे शेततळे तयार करून विचाराला पुर्णत्वास नेले. शेततळे नोव्हेंबरमध्ये भरुन ठेवले. त्यामुळे ऐन टंचाईस्थितीत शेती पाण्याबाबतीत संरक्षित झाली. त्‍यामुळे ढोबळ्या मिरचीचे अपेक्षीत उत्पादन घेता आले. एवढेच नाही तर कारले व भोपळा पिकाची टंचाईतही लागवड करून त्याची जोपासणा करणे शक्य झाले.

पीक पॅटर्न बदलला, चित्र बदलले
राहाता तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर वसलेले केलवड गाव. शेती हाच गावचा मुख्‍य व्‍यवसाय. गावातील कौटुंबिक अर्थव्‍यवस्‍था शेतीवरच आधारलेली. 2165 हेक्टर भौगोलिक क्षेत्र असलेल्या या गावशिवारात जवळपास 450 मिलीमीटर एवढा सरासरी पाऊस पडतो. त्यामुळे साहजिकच सर्व क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकरी बाजरी, सोयाबीन, मका यासारखी पिकं घेतात. 4.90 हेक्टर शेती असलेले शिवाजी वाघे हे इतर शेतकऱ्यांप्रमाणेच 2012-13 पर्यंत बाजरी, मका, सोयाबीन आदी खरीपाचीच पिके घेत असायची, मात्र शेततळ्यानंतर वाघे यांचा पीकपॅटर्नच बदलला आणि त्‍यांच्‍या शेतीच्‍या अर्थकारणात भर पडली.

सिंचनासाठी घेतले शेततळे
कोरडवाहू शेतीत पाणी नसल्याने अपेक्षित उत्पादकता गाठता येत नव्हती. त्यात सातत्याने टंचाईस्थितीने कोरडवाहू शेतीसमोर अडचणी निर्माण केल्या. यातून मार्ग काढण्यासाठी केलेल्या विचारातूनच शिवाजी वाघे यांच्यासमोर पाण्यासाठी शेततळे घेण्याचा पर्याय पुढे आला. 2012-13 मध्ये त्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत 34 बाय 34 बाय 4 आकारमानाचे शेततळे घेतले. सोबतच या शेततळ्यात त्यांनी नोव्हेंबर अखेरीस पावसाळ्यात पडलेले पाणी भरून ठेवले.

ठिबकची सोय अन्‌ पिकांची लागवड
शेततळे तयार केल्यानंतर शिवाजी वाघे यांनी जवळपास तीन हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आणले. त्या ठिबकच्या सोयीसह शेततळ्यात साठविलेल्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे त्यांनी 1 एकर द्राक्षे, 1 एकर 10 गुंठे भोपळा, दीड एकर कारले, 26 गुंठे शेडनेटमध्ये ढोबळ्या मिरचीची लागवड केली.

18 टन ढोबळ्या मिरचीचे उत्पादन
शेततळ्यात साठविलेल्या पाण्याच्या आधारे शिवाजी वाघे यांनी 26 गुंठे शेडनेटमध्ये लागवड केलेल्या ढोबळ्या मिरचीपासून त्यांना 20 मेपर्यंत 18 टन उत्पादन मिळाले. उत्पादीत ढोबळ्या मिरचीची त्यांनी राहाता येथील बाजारपेठेत विक्री केली. सरासरी 20 रूपये किलो दराने 3 लाख 60 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. त्यापैकी 1 लाख 40 हजार रूपये सर्व खर्च लागला. यापुढे आणखी 10 टन ढोबळी मिरचीचे उत्पादन अपेक्षित असून तिला 20 रूपये प्रतिकिलोचा दर मिळणेही अपेक्षित असल्याने आणखी दोन लाख रूपये उत्पन्न मिळणे अपेक्षित असून त्यासाठी किमान 55 ते 60 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. मिळालेले उत्पन्न व मिळू शकणारे उत्पन्न याची गोळाबेरीज करता 26 गुंठे शेडनेटमधील ढोबळ्या मिरचीपासून टंचाईस्थितीत त्यांना किमान 3 लाख 57 हजार 350 रूपये निव्वळ उत्पन्न मिळणे अपेक्षीत आहे.

नजिकची राहाता बाजारपेठ ठरली फायद्याची
केलवड ते राहाता मार्केटचे अंतर अंदाजे सात किलोमीटर आहे. गावात गटशेतीच्‍या माध्‍यमातून शेतकरी एकत्र आले आहेत. त्‍यामुळे भाजीपाला क्षेत्र वाढू लागले. शेतकरी यावर्षी नाशिकसह राज्‍यभरातील महत्‍वाच्‍या बाजारपेठेत आपला शेतीमाल पाठविणार आहेत, त्यामुळे खर्चातही कमालीची बचत होणार आहे. राहता बाजारपेठेत गवारीसह भाजीपाल्याचे दर स्थिर असल्याने केलवडसह राहता शहरानजीकची अनेक गावे आता भाजीपाला शेतीकडे वळू लागली आहेत.

कारले, भोपळ्याचीही केली लागवड
टंचाईस्थितीत ढोबळ्या मिरचीने भक्कम साथ दिल्याने शिवाजी वाघे यांना चांगलाच आधार मिळाला. नियोजनाने शेती केल्यास थोड्या पाण्यातही शाश्वत शेतीची कास धरता येऊ शकते, याची प्रचिती आल्याने उपलब्ध पाण्याच्या आधारावर 15 एप्रिल 2016 रोजी दिड एकर कारले व 1 मे 2016 रोजी 1 एकर 10 गुंठे भोपळा पिकाची लागवड केली. आजमितीला दोन्ही पिकांची वाढ चांगली असून या पिकांपासूनही शिवाजी वाघे यांना चांगले उत्पादन व उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी टंचाईस्थितीत कारले व भोपळयाचे भरघोस उत्पादन घेतले होते.

नियोजनाला जोड योजना अन्‌ तंत्रज्ञानाची
शासनाच्या योजनेंतर्गत शेततळ्याचा पर्याय निवडणाऱ्या शिवाजी वाघे यांनी शेतीविकासाच्या नियोजनाला सूक्ष्म सिंचनाची जोड दिली. शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतांना कृषी विभागाने दिलेल्या अनुदानाचाही शेतीच्या विकासात पुरेपूर वापर केला. कल्पकतेतून शेतीचं शाश्वत रूपडं साकारतांना शिवाजी वाघे यांनी केवळ शेततळ्याच्या आधारावर स्थैर्य देईल इतपत उत्पादनाची कास धरली. तालुका कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एन. आर. घोडके यांच्यासह कृषी विभागाकडून आपल्याला सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याचे वाघे यांनी सांगितले.

एकत्रित कुटुंबाचा आदर्श
शेतीतील मजूरटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी यांत्रिक औजारांचा वापर वाढविण्यावर भर दिला तर उर्वरित कामांच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे सोपविण्यात आल्या. शिवाजी वाघे यांच्यासह तीन भावांचे एकत्रित कुटुंब असल्याने ठरलेल्या वेळेतच मशागतीचे नियोजन करणे शक्य झाले. टंचाईस्थितीत योग्य व्यवस्थापनाने वाघे यांना ढोबळ्या मिरचीचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे.

-गणेश फुंदे,
प्र. माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, शिर्डी
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा